काय आहे नेमका कोरोनाचा नवा XE व्हेरिएंट? जाणून घ्या
कोरोनाचा नवा XE व्हेरिएंट अनेक देशांमध्ये सापडला असल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
लंडन : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटनंतर आता अजून एका व्हेरिएंट समोर आल्याने चिंता वाढली आहे. कोरोनाचा नवा XE व्हेरिएंट अनेक देशांमध्ये सापडला असल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, कोरोनाचा XE व्हेरिएंट हा ओमायक्रॉन व्हेरिएंटपेक्षा अधिक संक्रामक असू शकतो.
नेमका काय आहे कोरोनाचा नवा व्हेरिएंट?
कोरोनाचा नवा XE व्हेरिएंट हे ओमायक्रॉन व्हेरियंटच्या BA.1 आणि BA.2 या रिकॉम्बिनेशन स्ट्रेन असल्याचं मानलं जातंय. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, कोरोनाचा हा नवीन प्रकार ओमिक्रॉनच्या पहिल्या व्हेरिएंटपेक्षा 43 पट अधिक वेगाने पसरू शकतो.
ब्रिटनच्या ब्रिटीश हेल्थ सिक्युरिटी एजन्सीने केलेल्या अभ्यासानुसार, XE प्रकाराप्रमाणेच कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या सब-व्हेरियंटमधून XD हा आणखी एक व्हेरिएंट दिसून आला आहे. जोपर्यंत कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटचा प्रसार आणि तीव्रतेमध्ये कोणतेही मोठे बदल दिसून येत नाहीत तोपर्यंत जागतिक आरोग्य संघटना याला ओमायक्रॉन व्हेरिएंटशी जोडणार आहे.
किती धोकादायक आहे XE व्हेरिएंट?
यूकेच्या आरोग्य एजन्सीच्या मुख्य वैद्यकीय सल्लागार सुसान हॉपकिन्स यांनी सांगितलंय की, कोरोना व्हायरसच्या इतर व्हेरिएंटमुळे तयार झालेले नवीन व्हेरिएंट फारसे प्राणघातक नाहीत. तर दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या नवीन XE प्रकाराबाबत एक अहवाल जारी केलाय. यामध्ये हा व्हेरिएंट कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटपेक्षा अधिक धोकादायक असल्याचं म्हटलंय.
ब्रिटनमध्ये मिळाला होता XE व्हेरिएंट
कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटचा पहिला रूग्ण ब्रिटनमध्ये आढळला. तेव्हापासून, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, XE व्हेरिएंटची 600 हून अधिक नवीन प्रकरणं नोंदवली आहेत. तसंच ब्रिटन व्यतिरिक्त, XE व्हेरिएंटची फ्रान्स, डेन्मार्क, बेल्जियममध्ये दिसून आला आहे.