Suhani Bhatnagar Death : बॉलिवूड अभिनेता आमिर खान याच्या दंगल सिनेमामध्ये बबिता फोगाटची भूमिका साकारणाऱ्या सुहानी भटनागर (Suhani Bhatnagar) हिचं निधन 19 व्या वर्षी निधन झालं आहे. सुहानी भटनागरच्या निधनामुळे बॉलिवूडसह चित्रपट रसिकांना मोठा धक्का बसलाय. सुहानी गेल्या दोन महिन्यांपासून बेड रेस्ट होती. तिला दुर्मिळ आजार झाल्याची माहिती तिच्या आईवडिलांनी दिली आहे. मात्र, सुहानी भटनागरच्या मृत्यूचं कारण ठरलेला 'डर्मेटोमायोसाइटिस' आजार (Dermatomyositis) असतो तरी काय? असा सवाल आता विचारला जातोय. यावर पुण्यातील डॉक्टर गजानन शिंदे (Dr. Gajanan Shinde) यांनी सविस्तर माहिती दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डर्माटोमायोसिटिस आजार असतो तरी काय? (Dermatomyositis)


डर्माटोमायोसिटिस हा एक दुर्मिळ आजार आहे. डर्माटोमायोसिटिसच्या सामान्य लक्षणांमध्ये त्वचेवर पुरळ उठणे, स्नायू कमकुवत होणे आणि दाहक मायोपॅथी किंवा सूजलेले स्नायू यांचा समावेश होतो. हे केवळ तीन ज्ञात दाहक मायोपॅथीपैकी एक आहे. डर्माटोमायोसिटिसचे नेमकं कारण काय आहे, याबाबत प्रखरतेने कोणालाही माहिती नाही. त्यात स्वयंप्रतिकार रोगासह अनेक समानता आहेत. एक स्वयंप्रतिकार रोग उद्भवतो जेव्हा शरीरातील रोगाशी लढणाऱ्या पेशी, ज्याला अँटीबॉडीज म्हणतात, तुमच्या निरोगी पेशींवर हल्ला करतात. कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती देखील रोगास कारणीभूत ठरू शकते, असं डॉक्टर गजानन शिंदे यांनी सांगितलं आहे. 


महिलांना धोका अधिक


डर्माटोमायोसिटिस हा आजार वयस्कर लोकांना आणि लहान मुलांमध्ये अधिक दिसून येतो. हा रोग प्रामुख्याने वय वर्ष 5 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये दिसून येतो. डर्माटोमायोसिटिस पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक सामान्य असल्याचं देखील गजानन शिंदे सांगतात. हा आजार वयाच्या 40 व्या वर्षाच्या शेवटी किंवा 60 व्या वर्षीच्या सुरूवातीला देखील दिसून येतो. डर्माटोमायोसिटिसवर कोणताही इलाज नाही, परंतु डॉक्टरांचा योग्य वेळी सल्ला घेतल्यास लक्षणांमध्ये सुधारणा दिसून येते.


दरम्यान, 11 दिवसांपूर्वी सुहानीला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं तिची चाचणी केल्यानंतर डर्मेटोमायोसाइटिस नावाचा दुर्मिळ आजार झाल्याचं कळालं, अशी माहिती सुहानीच्या वडिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. या आजारावर फक्त स्टेरॉइड्स हाच उपचार आहे. यानंतर तिला स्टेरॉइड्स देण्यात आलं. पण यामुळे तिच्या शरिरातील ऑटो इम्यून सिस्टम प्रभावित झाली आणि तिची प्रतिकारशक्ती कमी झाली, असंही सुहानीच्या वडिलांनी सांगितलं आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सुहानीची आतडी दुबळी झाली. तिच्या आतड्यात पाणी भरल्यानं श्वास घेणं कठीण झालं होतं.