Health News : एखाद्या सुपरमार्केटमध्ये आपण जेव्हा जेव्हा जातो तेव्हातेव्हा बाहेर पडताना आपल्या हातात किमान दोन ते तीन पिशव्या असतात. कारण, खरेदी करण्यासाठी एकच पिशवी घेऊन गेलेलो आपण तिथं गेल्यावर अशी काही खरेदी करतो की हे सर्व सामान एकाच पिशवीत मावणं अशक्य. फक्त सुपरमार्केटच नव्हे, साधं वाणसामानाच्या दुकानात गेलं तरीही तिथं आपण एका वस्तूऐवजी चार वस्तू खरेदी करतो आणि बिलावरचा आकडा वाढवतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा आपण खरेदी केलेल्या वस्तू वर्ष उलटून गेली तरीही घरात एकाच ठिकाणी पडून असतात कारण, मुळातच त्या वस्तूंची आवश्यकता नसते. इथं फक्त काय ते वाणसामानच अपवाद ठरतं. पण, अनेकदा त्याचाही इतका साठा केला जातो की डाळी, कडधान्यांना किडामुंगी लागते, पदार्थांची चवही बदलते. सरतेशेवटी अनेकांचा एकच सूर, 'आमची ही सवयच वाईट...' 


ही सवय नव्हे, हा तर एक आजार... 


महत्त्वाची गोष्ट म्हणजे गरज नसतानाही वस्तूंची खरेदी करणं, त्यांची अवाजवी साठवणूक करून ठेवणं, घरातील जुन्या वस्तू न फेकणं या सवयी नसून हा एक आजार आहे. ही एक प्रकारची मानसिक व्याधी असून, ऐकिवात ही एक सामान्य बाब असली तरीही त्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. या लक्षणांना होर्डिंग डिसॉर्डर (Hoarding Disorder)असं म्हणतात. 


अटेंशन-डेफिसिट/हाइपरएक्टिविटी डिसऑर्डर (ADHD) ची समस्या असणाऱ्या अनेकांमध्ये होर्डिंग डिसॉर्डरची लक्षणं दिसून येतात. या आजारामध्ये अमुक एका व्यक्तीला सतत काही न काही खरेदी करण्याची सवय लागते. अनेकदा ही वस्तू निरुपयोगीच असते. वर्तमानपत्र, घरातील सामान, कपडे, वस्तू या आणि अशा वस्तूंचा यात समावेश असतो. काही मंडळी तर अनेक प्राणीसुद्धा खरेदी करतात. 


हेसुद्धा वाचा : अवघ्या 6 लाखांमध्ये मिळणार Thar? आता बिनधास्त घ्या ऑफरोडिंगचा आनंद 


(Hoarding Disorder) होर्डिंग डिसॉर्डरचे परिणाम वेगवेगळ्या वयात विविध प्रकारे दिसून येतात. याचा परिणाम सामाजिक, कौटुंबीक आणि नोकरीच्या ठिकाणी दिसून येतो. शिवाय सातत्यानं त्या व्यक्तीच्या मनात असुरक्षिततेची भावनाही घर करून राहते 


निरीक्षण काय सांगतं? 


 जर्नल ऑफ साइकियाट्रिकमधील माहितीनुसार, या निरीक्षणाचा भाग असणाऱ्या 5 पैकी एका व्यक्तीमध्ये या आजारपणाची लक्षणं दिसून आली. जाणकारांच्या मते होर्डिंग डिसॉर्डर फक्त संपत्तीपुरताच मर्यादित नसून त्याहीपलिकडे अनेक गोष्टी घडताना दिसतात. ज्यामुळं व्यक्तींना नैराश्य येण्याचीही भीती असते. 


वस्तू साठवण्याची सवय नेमकं काय दर्शवते? 


स्किझोफ्रेनिया आणि तत्सम मानसिक आजार, ऑबसेसिव्ह कंपल्सिव्ह डिसॉर्डर असणाऱ्यांमध्ये होर्डिंग डिसॉर्डर दिसून येते.  एकटं राहणाऱ्या व्यक्ती, अविवाहित व्यक्ती, अनेक वर्षांपासून वस्तू साठवण्याची सवय असणाऱ्या व्यक्तींमध्येही हा आजार आढळून येऊ शकतो.


लक्षणं...


  • अनावश्यक वस्तू वारंवार खरेदी करण्याची सवय

  • खरेदी केलेल्या वस्तू व्यवस्थित न ठेवण्याची सवय 

  • निर्णयक्षमतेत अडथळे 

  • आप्तेष्ठांशी असणाऱ्या नात्यांमधील तणाव 

  • अती भावनिक किंवा रागीष्ट असणं 

  • स्वयंपाक, स्वच्छतेची कामं करताना अडचणी येणं 


वरील सवयी आणि लक्षणं असणाऱ्या व्यक्तींवर तणाव, अँक्झायटीसारख्या आजारांवरील उपचार केले जातात. या व्यक्तींशी संवाद साधून त्यांच्या या व्याधीवर तोडगा शोधला जातो.