मुंबई : कोरोनाची दुसरी लाट आता कमी होताना दिसतेय. मात्र येत्या 6 ते 8 आठवड्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. दरम्यान हा व्हायरस रूप बदलत असल्याने चिंता अधिकच वाढली आहे. वायरसच्या डेल्टा वेरिएंटनंतर आता याच्या ‘डेल्‍टा प्‍लस’ किंवा ‘AY.1 Variant’ ने अजूनच सर्वांची चिंता वाढवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या डेल्टा वेरिएंटने तयार झालेल्या या नव्या वेरिएंटबाबत विषाणूशास्त्रज्ञ देखील चिंतेत असून त्याच्या अभ्यासावर जोर देण्यात येतोय. अलीकडेच, केंद्र सरकारने हे मान्य केले आहे की कोरोनाचा नवीन प्रकार मागील डेल्टा व्हेरिएंटच्या जवळचा आहे. 


डेल्टा प्लस वेरिएंट काय आहे?


कोरोना व्हायरसचा नवा वेरिएंट 'डेल्टा प्लस' हा डेल्टा वेरिएंटचं विकसित रूप आहे. यापूर्वी डेल्टा वेरिएंट सापडला होचा. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत बहुतेक लोक या डेल्टा वेरिएंटला बळी पडले होते. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, डेल्टा वेरियंट विकसीत होऊन डेल्टा प्लस बनला आहे. यावर केंद्र सरकार सातत्याने लक्ष ठेवून आहे.


सरकारशी संबंधित तज्ज्ञांचं म्हणणे आहे की, भारतात नवीन रूपाच्या संक्रमणासंदर्भात अभ्यास सुरू आहे. सरकारने असं म्हटलं आहे की, 'म्युटेशन हे एक जैविक सत्य आहे आणि आपल्याला ते रोखण्यासाठी मार्ग अवलंबले पाहिजेत. त्यासाठी आपल्याला सर्व सावधगिरी बाळगण्याची गरज आहे जेणेकरून त्याचा प्रसार होण्यापासून रोखता येईल.


कसा तयार झाला डेल्टा प्लस वेरिएंट?


डेल्टा वेरियंट म्हणजे बी.1.617.2 स्ट्रेनच्या म्युटेशनने डेल्टा प्लस वेरिएंट बनलं आहे. या म्युटेशनला K417N म्हटलं जातंय. कोरोना व्हायरसच्या स्पाईक प्रोटीनमध्ये म्हणजेच जुन्या वेरिएंटमध्ये काही बदल झाले आहेत. यामुळेच नवा वेरिएंट समोर आला आहे. स्पाईक प्रोटीनच्या मदतीनेच हा व्हायरस शरीरात प्रवेश करतो आणि आपण संक्रमित होतो. K417N म्यूटेशनमुळे व्हायरस आपल्या इम्युन सिस्टिमसाठी धोकादायक असतो.


व्हायरसमध्ये म्युटेशन का होतं?


तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, व्हायरस कोणताही असो, तो नेहमीच त्याचं जेनेटिक स्ट्रक्चर बदलत राहतो. जेव्हा त्याची रचना बदलते, तेव्हा आपण त्यासा एक नवीन नाव देतो. जसं आपण व्हायरसला संपवू इच्छितो तसा तो त्याचं रूप बदलून परत येतो.


व्हायरसच्या नव्या वेरिएंटपासून बचाव कसा करावा


कोरोना डेल्टा विषाणूनंतर डेल्टा प्लस चर्चेत आहे. यापासून बचाव करण्यासाठी स्वतंत्र उपाययोजना करण्याची गरज नाही. जसं आतापर्यंत आपण खबरदारी घेत होतो तशीच खबरदारी आता घ्यावी लागणार आहे. यामध्ये मास्कचा वापर, हात स्वच्छ ठेवाणं, सोशल डिस्टंसिंग यांचं पालन करावं लागणार आहे.


आपण आतापर्यंत वापरत असलेली लस वेरिएंटवर देखील प्रभावी आहे. कारण व्हायरस नवीन आहे आणि जेनेटिक स्ट्रक्चर देखील नवीन आहे, त्यामुळे पुढील काळात लस किती प्रभावी आहे हे समजण्यास मदत होणार आहे.