केपटाऊन : कोरोना विषाणूच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटची प्रकरणं झपाट्याने वाढतायत. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या ओमायक्रॉन एपिसेंटरमधील एका मोठ्या रुग्णालयातील प्राथमिक आकडेवारीवरून असं सूचित होतं की, कोविड-19 संसर्गाची संख्या वाढली आहे, परंतु रुग्णांना क्वचितच गंभीर वैद्यकीय मदतीची आवश्यकता दिसून येतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रिटोरियातील स्टीव्ह बिको आणि जिल्हा रुग्णालयात 14 ते 29 नोव्हेंबर दरम्यान 166 नवीन रुग्ण आढळले. त्यापैकी 42 रुग्ण अजूनही वॉर्डमध्ये दाखल आहेत. दक्षिण आफ्रिकन मेडिकल रिसर्च काऊंसिल आणि स्टीव्ह बिको हॉस्पिटलमधील संसर्गजन्य रोगांचे डॉक्टर फरीद अब्दुल्ला यांनी या रुग्णांमधील लक्षणं आणि त्यांची स्थिती जवळून पाहिली.


नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसीजसने पुष्टी केली होती की, केंद्रातील जवळजवळ सर्व नवीन प्रकरणं ओमायक्रॉन व्हेरिएंटची आहेत. मात्र डॉ. अब्दुल्ला आणि त्यांच्या टीमने अद्याप पुरावे गोळा केलेले नाहीत की, संसर्गाची सर्व नवीन प्रकरणं ओमायक्रॉन प्रकारातील आहेत. 


कशी आहे रूग्णांची परिस्थिती


कोविड-19 वॉर्डमध्ये दाखल झालेल्या बहुतेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत नाही, जसं की मागील लाटेमध्ये दिसून आलं होतं. 2 डिसेंबर रोजी एकूण 38 रुग्ण दाखल झाले. या 38 प्रौढांपैकी, 6 जणांचं लसीकरण करण्यात आलं होतं. तर 24 लसीकरण न केलेले होते आणि 8 लोक होते ज्यांची लसीकरण स्थिती माहित नव्हती. 


पूर्णपणे लसीकरण झालेल्या फक्त एका व्यक्तीला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. मात्र, फुफ्फुसासंदर्भात आजार असल्याने त्या रूग्णाला उपचाराची गरज होती. या दोन आठवड्यांत, 2 लोकांना अतिदक्षता विभागात ठेवणं आवश्यक होतं.


कोविड वॉर्डमध्ये दाखल झालेल्या रुग्णांपैकी सुमारे 19 टक्के रुग्ण हे 9 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुलं होती. तर 28 टक्के रुग्ण हे 30 ते 39 वयोगटातील होते. 


कोविड वॉर्डच्या अहवालानुसार, गेल्या दोन आठवड्यात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. गेल्या 18 महिन्यांतील एकूण मृत्यूंमध्ये मुलांचा वाटा 17 टक्के आहे. येथे आतापर्यंत एकूण 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, याचं कारण ओमायक्रॉन असल्याचं मानलं जात नाही.