मुंबई : लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं, असं आपण म्हणतो. ती खरंच फार गोड, निरागस असतात. पण एका ठराविक वयानंतर त्यांच्यात होणारे बदल वेळीच लक्षात घ्यायला हवेत. म्हणजे ३-५ या वयोगटात ती नकळत अगदी लहान सहान खोटं बोलू लागतात. त्यामुळे कोणाला त्रास होईल असे नाही. पण मी नाही ते खेळणं तोडलं, मी नाही केक खाल्ला किंवा मी नाही शूज घालून आत आले/आलो. यासारख्या साध्या साध्या गोष्टीत ते खोटं बोलतात. सुरवातीला आपल्याला त्याची गंमत वाटते. पण नंतर हेच खोटे बोलणे गंभीर होऊ लागते. ३-५ वर्षांची मुले त्यांना काही हवं असेल तरच खोटं बोलतात किंवा तुम्ही ओरडू, रागावू नये म्हणून ते अशी शक्कल लढवतात. तुम्ही त्यांचे खोटे बोलणे पकडल्यावर पालकत्वाच्या नात्याने त्यांना समजवता. प्रामाणिक राहण्याचा सल्ला देता. पण त्याचा क्वचितच परिणाम होतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेळीच आवर न घातल्यास त्यांना खोटं बोलण्याची सवय लागते. आणि मग त्यांचे खोटे बोलणे फार निरागस नसते. म्हणजे होमवर्क केला असे खोटे सांगणे, शाळेतल्या गोष्टी घरी न सांगणे किंवा लोकांबद्दल खोटे बोलणे. जर तुमचं मूल खोटं बोलत असेल तर वेळीच सावध व्हा. खोटं बोलण्याची सवय होण्याआधी त्यांच्या वर्तवणुकीत बदल करा. त्यासाठी काही खास टिप्स...


स्वतःची वर्तवणूक तपासून बघा:


बरेचदा दैनंदिन जीवनात आपल्या नकळत आपण खोटे बोलतो. आपली मुलं आपले निरीक्षण करत असतात. त्यातूनच ती शिकत असतात. याचे आपल्याला भान नसते. ट्राफिक सिग्नल तोडणे, गॉसिपिंग करणे, मी घरी नाहीये असं मुलांना सांगायला लावणे अशा प्रकारचे खोटे आपण बोलत असतो. कोणालाही फारसा त्रास न देणारे हे खोटं आहे, असं म्हणत स्वतःची समजूत घालतो. परंतु मुलांना त्याविरुद्ध शिकवत असतो. 


तुमच्या प्रतिक्रीयांवर लक्ष ठेवा:


तुम्ही रागावू नये म्हणून बरेचदा तुमचे मुल खोटं बोलतं. मुलाला खोटे बोलणे चुकीचे आहे किंवा ते का बोलू नये याची समज नसते. जर त्याचा एखाद्या चुकीवर तुम्ही खूप जोरात ओरडलात किंवा रागावलात तर पुढच्या वेळी मुलाकडून एखादी चूक झाल्यास ते नक्कीच खोट बोलेल. 


स्पष्ट पण सौम्य शब्दात बोला: 


मुलांकडून चूक झाल्यावर त्यांना ओरडू, रागावू नये तर काय करावे? त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव कशी करून द्यावी? हा प्रश्न सर्वच पालकांना पडतो. यासाठी महत्त्वाचा नियम म्हणजे स्पष्ट पण सौम्य शब्दात बोला. तुम्हाला मुलाला काय शिकवायचे आहे त्याबाबत स्पष्ट रहा आणि त्या शिकवणुकीत सातत्य पाळा. पण ते शिकवताना सौम्य शब्दांत बोला. त्यांना जवळ घेऊन समजवा की काय योग्य आहे काय अयोग्य. शिस्तीचे महत्त्व पटवून द्या. 


मुलाला खोटं बोलण्याची सवय लागण्याआधी ती वेळीच बदलणे योग्य ठरेल. मुलाशी तुमचे नाते हेल्दी असल्यास तुमचे म्हणणे मुलाला पटवून देणे सोपे होईल.