कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणतं हॅन्ड सॅनिटायझर वापराल?
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणतं सॅनिटायझर?
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने (Coronavirus) भारतातही प्रवेश केला आहे. गेल्या आठवड्यात भारतात हॅन्ड सॅनिटायझरची (Hand sanitizer) मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याची माहिती आहे. अनेक जण स्वत:ला, आपल्या कुटुंबियांना कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी, त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सॅनिटायझरची खरेदी करत असल्याचं चित्र आहे. सॅनिटायझरमुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्याची सर्वसाधारण धारणा आहे. पण सॅनिटायझर खरेदी करण्यापूर्वी ते अल्कोहलयुक्त आहे किंवा नाही हे तपासणं आवश्यक आहे. पण तुम्हाला माहितेय का व्हायरस आणि बॅक्टेरियाशी लढण्यासाठी सॅनिटायझरमध्ये किती टक्के अल्कोहल असणं गरजेचं आहे?
दोन प्रकारचे सॅनिटायझर -
बाजारात सॅनिटायझर मागितल्यानंतर दुकानदार कोणत्या तरी एका कंपनीचं सॅनिटायझर देतो. पण सॅनिटायझर खरेदी करताना ते नक्की कोणत्या कारणासाठी खरेदी करत आहात ते जाणून घेणं आवश्यक आहे. बाजारात दोन प्रकारचे सॅनिटायझर उपलब्ध आहेत. एक अल्कोहलयुक्त आणि दुसरं विना अल्कोहलयुक्त.
जर तुम्ही केवळ घर आणि ऑफिसमध्येच काम करत असाल, कामासाठी कुठेही येणं-जाणं कमी असेल, तर नॉन अल्कोहलयुक्त सॅनिटायझर (०.०१ टक्के अल्कोहल) उपयुक्त आहे.
पण जर तुम्ही ट्रान्सपोर्ट, डिलिव्हरी, फॅक्टरी इंडस्ट्री, रुग्णालय अशा ठिकाणी काम करत असाल, जिथे लोकांचं जाणं-येणं, त्यांच्या संपर्कात येणं अधिक प्रमाणात असेल, तर अल्कोहलयुक्त सॅनिटायझर (६०-६५% अल्कोहल) वापरणं उपयुक्त ठरेल.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणतं सॅनिटायझर?
कोरोना व्हायरस गंभीर स्वरुपाचा व्हायरस आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी, त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अल्कोहलयुक्त सॅनिटायझर मदतशीर आहे. ६० ते ६५% अल्कोहलयुक्त सॅनिटायझर ९९.९ टक्के किटाणूंचा नाश करत असल्याचं बोललं जातं. म्हणूनच, कोरोना व्हायरच्या संभाव्य संसर्गाच्या वातावरणामध्ये, केवळ अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर वापरणं उपयुक्त ठरु शकतं.