Covaxinच्या मंजूरीसाठी का होतोय विलंब? WHOने सांगितलं कारण
Covaxin लस मंजूर करण्यास झालेल्या विलंबाबाबत WHOचं एक मोठं विधान समोर आलं आहे.
मुंबई : भारत बायोटेकची कोरोना लस Covaxin अजूनही जागतिक आरोग्य संघटनेच्या मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. दरम्यान, लस मंजूर करण्यास झालेल्या विलंबाबाबत WHOचं एक मोठं विधान समोर आलं आहे. डब्ल्यूएचओच्या म्हणण्याप्रमाणे, म्हणणे आहे की भारत बायोटेककडून अद्याप लसीबद्दल अधिक माहिती हवी आहे. जेणेकरून आपत्कालीन वापरासाठी लस मंजूर होण्यापूर्वी त्याचे संपूर्ण मूल्यांकन केलं जाऊ शकतं.
भारत बायोटेक बऱ्याच काळापासून डब्ल्यूएचओच्या कोव्हॅक्सिनच्या मंजुरीची वाट पाहत आहे. हैदराबादस्थित भारत बायोटेकने 19 एप्रिल रोजी लसीशी संबंधित डेटा संस्थेकडे सुपूर्द केला.
डब्ल्यूएचओने लस मंजूर होण्यास होणाऱ्या विलंबाबाबत एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी सांगितले की, मंजुरी मिळण्यात इतका विलंब का? डब्ल्यूएचओने म्हटलं आहे की, बरेच लोकं लस मंजूर होण्याची वाट पाहत आहेत. परंतु आपत्कालीन वापरासाठी कोणतीही लस मंजूर करण्यापूर्वी, ती सुरक्षित आणि प्रभावी आहे की नाही याचे मूल्यांकन करणं आवश्यक आहे.
WHO ने असंही सांगितलं की, भारत बायोटेक लसीसंदर्भात सातत्याने डेटा देत आहे. त्यांनी दिलेला डेटा रिव्ह्यू केला जात आहे. WHO अजून डेटाची अपेक्षा करत आहे.
WHOच्या या ट्विटच्या एक दिवस आधी, संस्थेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितलं होतं की, 26 ऑक्टोबर रोजी संस्थेच्या तांत्रिक सल्लागार गटाची बैठक होणार आहे. ज्यामध्ये लस मंजूर करण्याचा विचार आहे.