Monkeypox कोरोनानंतर महामारीचं कारण बनणार? WHO अखेर उत्तर दिलंच
मंकीपॉक्स संसर्गामुळे पुढील जागतिक महामारीचे कारण बनण्याची भीती आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसनंतर आता जगभरात मंकीपॉक्स संसर्गाच्या वाढत्या रुग्णांमुळे चिंता वाढली आहे. आतापर्यंत 24 देशांमध्ये या संसर्गाची 435 हून अधिक प्रकरणं नोंदवली गेली आहेत. मंकीपॉक्स संसर्गामुळे पुढील जागतिक महामारीचे कारण बनण्याची भीती आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्याप्रमाणे, मंकीपॉक्समुळे जागतिक महामारी येऊ शकते हे सांगणं खूप घाईचं ठरू शकतं.
डब्ल्यूएचओच्या मते, आफ्रिकेबाहेर महामारी नसलेल्या देशांमध्ये वाढलेल्या प्रकरणांशी संबंधित बरीच माहिती अजून मिळालेली नाही. अहवालात असं म्हटलंय की, या संसर्गाकडे कोरोनाच्या पद्धतीने पाहिलं जाऊ नये.
मंकीपॉक्स हा कोरोनापेक्षा भिन्न
डब्ल्यूएचओचे संचालक सिल्वी ब्रायंड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "आम्हाला लोकांनी घाबरून जावं आणि ते कोविड-19 सारखं किंवा कदाचित त्याहूनही वाईट आहे असा विचार करू नये." मंकीपॉक्स हा कोरोनासारखा नसून तो वेगळा व्हायरस आहे.
हा व्हायरस पहिल्यांदाच समलिंगी पुरुषांमध्ये दिसून आलाय. तज्ज्ञांनी समलिंगी पुरुषांना या व्हायरससंदर्भात सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. लुईस म्हणाले की, जगाला हा संसर्ग रोखण्याची संधी आहे.