Covishield लसीच्या दोन डोसमधील कालावधी कमी होणार?
अशातच आता लसींच्या डोसांबद्दल एक मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
मुंबई : अजूनही देशावरून कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. कोरोनाचा धोका कमी व्हावा यासाठी देशभरात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली असून या मोहिमेला वेग देण्यात येतोय. अशातच आता लसींच्या डोसांबद्दल एक मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. यामध्ये कोविशिल्ड लसीच्या दोन डोसांमधील अंतर कमी होण्याची शक्यता आहे.
सध्या कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर 12-16 आठवडे आहे. आधी ते 4-6 आठवडे होते पण नंतर ते वाढवून 4-8 आठवडे करण्यात आले. त्याच वेळी, हे अंतर शेवटी 12-16 आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आलं आहे.
दरम्यान दोन कोरोना लसीच्या डोसांमधील अंतर वाढवलं गेलं त्यावेळी त्यावर टीकाही करण्यात आली. कारण लोकांकडून असा तर्क काढण्यात आला होती की देशात लसींच्या अभावामुळे सरकारकडून असा निर्णय घेतला जात आहे. त्याच वेळी, शास्त्रज्ञांनी सांगितले की, कोरोना लसीच्या दोन डोसमधील दीर्घ फरकामुळे अधिक अँटीबॉडीज तयार होतात.
दरम्यान देशात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनातून बरं झालेल्यांच्या तुलनेत, देशात अधिक संख्येने नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल्याची माहिती आहे. देशात या कालावधीत 44 हजार 643 नवे कोरोनाबाधित आढळले असून 41 हजार 96 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. याशिवाय, 464 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयामार्फत देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशात सध्याच्या घडीला अॅक्टीव्ह रूग्णसंख्या 4,14,159 आहे. तर एकूण 3,10,15,844 रूग्ण कोरोनातून बरे झालेले आहेत. तसंच, 49,53,27,595 जणांचं लसीकरण झालेलं आहे.