मुंबई : कॅन्सरविरोधात (Cancer) एकत्रितपणे लढाई लढण्यासाठी दरवर्षी ४ फेब्रुवारी हा दिवस 'जागतिक कर्करोग दिवस' (World Cancer Day) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागे, कॅन्सरबाबत अधिक जागरुकता निर्माण करणं हा आहे.  १९३३ मध्ये आंतराष्ट्रीय कॅन्सर नियंत्रण संघाने स्विझरलँडमधील जिनेवा शहरात पहिल्यांदा जागतिक कर्करोग दिवस साजरा करण्यात आला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगात कॅन्सरमुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू होतो. हा शरीरातील पेशींमध्ये वेगाने पसरणारा आजार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जगभरात दरवर्षी ७६ लाख लोकांचा कॅन्सरमुळे मृत्यू होतो. कॅन्सरमुळे मृत्यू होणाऱ्या लोकांमध्ये ४० लाखांहून अधिक लोक ३० ते ६९ वयोगटातील असल्याची माहिती आहे. एका अंदाजानुसार, २०२५ पर्यंत, कॅन्सरमुळे वेळेआधीच मृत्यू होणाऱ्यांच्या आकड्यात वाढ होऊन तो दरवर्षी ६० लाखांपर्यंत पोहचू शकतो. 


कॅन्सरबाबत अनेकांमध्ये गैरसमज आहेत. देशातील अनेक डॉक्टरांनी, समजूतीने आणि काही गोष्टी टाळून कॅन्सरपासून बचाव केला जाऊ शकत असल्याचं सांगितलं आहे. 


धर्मशिला नारायण सुपर स्पेशलिस्ट रुग्णालयात ऑन्को सर्जन, डॉ. अंशुमन कुमार यांनी कॅन्सर जेनेटिक अर्थात अनुवांशिक नसल्याचं सांगितलं आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला तर इतरांनाही होऊ शकतो असा अनेकांचा समज असतो. परंतु केवळ ५ ते १५ टक्के कॅन्सर अनुवांशिक कारणांमुळे होऊ शकतात. कुटुंबातील सर्वच जण एकाच प्रकारची जीवनशैली, आहार घेतात, त्यावेळी एकाच प्रकारचा कॅन्सर होण्याची शक्यता असते.


डॉ. अंशुमन यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होण्याचं सर्वात मोठं कारण हे फास्ट फूड, तळलेले पदार्थ, फॅटी फूड खाणं हे असल्याचं सांगितलं. अशाप्रकारच्या खाण्यामुळे मुलांमध्येही कॅन्सरची शक्यता निर्माण होऊ शकते. चुकीचा आहार, चुकीचं खाणं-पिणं कॅन्सरचं कारण ठरत आहे.


डॉ. अंशुमन कुमार (ऑन्को सर्जन) - धर्मशिला नारायण सुपर स्पेशलिस्ट रुग्णालय

खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या -


कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी डॉक्टर सर्वाधिक जीवनशैली  आणि खाण्या-पिण्याच्या पद्धतीला मदतशीर असल्याचं मानतात. दररोज कमीत-कमी ३० मिनिटं व्यायाम आणि जेवणात पालेभाज्या, सलाडचा समावेश कॅन्सरला दूर पळवू शकतो. पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राय यांसारख्या पदार्थांपासून दूर राहणं सर्वात फायदेशीर आहे. मुलांना कॅन्सरपासून दूर ठेवण्यासाठी चॉकलेट आणि फास्टफूडपासून लांब ठेवणं गरजेचं आहे.


महिलांनी सौंदर्य प्रसाधनांकडे विशेष लक्ष देणं -


डॉक्टरांनी महिलांना त्यांच्या सौंदर्य प्रसाधनांकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. कॉस्मेटिक खरेदी करताना वस्तूच्या गुणवत्तेकडे अधिक लक्ष द्यावं. हानिकारक केमिकल मिसळलेल्या स्वस्त आणि मोफत मिळणाऱ्या वस्तूंकडे आकर्षित होऊ नये. अशाप्रकारच्या वस्तूंमध्ये प्लॅस्टिक मिसळलं असण्याची शक्यता असते. जे शरीरात जाऊन कॅन्सरचं कारण ठरु शकतं.


बॉडी चेकअप करणं - 


कॅन्सर संबंधित डॉक्टरांनी, ३० वयवर्षानंतंर प्रत्येक व्यक्तीने वर्षातून एकदा संपूर्ण बॉडी चेकअप करणं आवश्यक असल्याचं सांगितलं आहे. अशाप्रकारे केलेल्या बॉडी चेकअपमुळे, कॅन्सरचा कोणताही धोका ओळखून त्यावर लवकरात लवकर इलाज केले जाऊ शकतात. देशात अधिकतर कॅन्सरचं निदान अतिशय उशिरा होतं. कॅन्सरचं निदान होण्यास उशिर झाल्याने कॅन्सर शरीरात अधिक प्रमाणात पसरला जातो. अशात इलाजासाठी खर्चही अधिक प्रमाणात होतो. 


महत्त्वाच्या गोष्टी - 


- संशोधनातून असं समोर आलं आहे की, दररोज व्यायाम करण्यामुळे कॅन्सरपासून बचाव केला जाऊ शकतो. 


- अधिक वजन असण्यानेही कॅन्सरचा धोका होऊ शकतो. बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका वाढला आहे.


- धुम्रपान करण्याने तोंडाच्या कॅन्सरचा मोठा धोका असतो. 


- उन्हाच्या तीव्र किरणांपासूनही स्वत:चा बचाव करणं गरजेचं आहे. सूर्याच्या अल्ट्रा-वॉयलेट (UV)किरणांमुळे त्वचेच्या कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो. 


- त्वचेवर कोणत्याही प्रकारचे बदल आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करणं अत्यावश्यक आहे.