World Heart Day : याकडे दुर्लक्ष करणे ठरतेय तरुणांमध्ये हृदयरोगाचे प्रमुख कारण
World Heart Day : कमी वयात हृदयविकाराचा आजार जडत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या 25 ते 40 वयोगटातील तरुणांमध्ये हृदयविकाराच्या समस्या वाढल्या आहेत.
मुंबई : World Heart Day : कमी वयात हृदयविकाराचा आजार जडत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या 25 ते 40 वयोगटातील तरुणांमध्ये हृदयविकाराच्या समस्या वाढल्या आहेत. कार्डियाक स्क्रिनिंगकडे दुर्लक्ष करणे हे तरुणांमध्ये हृदयरोगाचे प्रमुख कारण ठरत आहे. याबाबत डॉक्टरांनी सल्ला दिला आहे की, नियमित हृदयाची तपासणी करणे आवश्यक आहे.
तरुण लोकसंख्येमध्ये नियमित हृदय तपासणी आणि जीवनशैली चांगले बदल करणे आवश्यक आहेत. स्क्रीनिंगमुळे प्राणघातक घटना घडण्याआधीच रोगाचा शोध घेण्याची आणि त्यानंतर उपचार करण्याची संधी मिळते, असे सांगत याबाबत काही डॉक्टरांनी सल्ला दिला आहे.
लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, धूम्रपान, भरपूर अल्कोहोल पिणे, गतिहीन जीवनशैली, स्टिरॉइड्स किंवा बॉडी बिल्डींग सप्लीमेंट्सचा वापर किंवा उच्च रक्तदाब यांसारखे घटक तुमच्या हृदयाचा धोका वढवू शकतात. धूम्रपानामुळे उच्च रक्तदाबही निर्माण होऊ शकतो आणि रक्तवाहिन्या देखील अरुंद होतात ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
पुण्याच्या अपोलो क्लिनिकमधील इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. प्रमोद नरखेडे म्हणाले की, ‘मधुमेह, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्टेरॉलचा कौटुंबिक इतिहास असलेल्या लोकांना हृदयरोगाचा धोका असू शकतो. छातीत अनियमित अस्वस्थता, धडधडणे, तीव्र घाम येणे, मान, हात, जबडे आणि खांद्यांमध्ये वेदना किंवा श्वास लागणे, थकवा, चक्कर येणे, अस्वस्थता ही हार्ट फेल्युअरची प्रमुख लक्षणे आहेत. कोणतीही गुंतागुंत टाळण्यासाठी कुटुंबाने त्वरित जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. तत्पूर्वी तुम्ही जीवनशैलीत बदल किंवा औषधोपचार करून त्यांचा शोध घ्या आणि त्यावर उपचार करा, जे तुम्हाला सुरक्षित आणि निरोगी राखण्यास मदत करेल.’
लोकमान्य रूग्णालयातील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अमित सिनकर म्हणाले की, ‘‘कार्डियाक स्क्रीनिंग प्रोग्राममुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो. आपल्याकडे मधुमेह, रक्तदाब किंवा हृदयाच्या आजाराचा कौटुंबिक इतिहास असल्यास, आपण ते शक्य तितक्या लवकर शोधणे महत्वाचे आहे जेणेकरून आपण वेळेवर उपचार मिळवू शकाल. स्क्रीनिंगमुळे भविष्यात तुम्हाला हृदयरोगाचा धोका होऊ शकतो अशी स्थिती निर्माण होऊ शकते. उच्च रक्तदाब किंवा मधुमेह यासारख्या समस्यांवर उपचार घेतल्यास ते तुमच्या हृदयावर परिणाम करण्यापासून रोखू शकतात. हृदयविकाराची शक्यता कमी करण्यासाठी आपण वेळीच –हदयासंबंधी तपासणी करून घेणे नक्कीच फायदेशीर ठरते.’’
पुण्यातील अपोलो डायग्नोस्टिक्सचे पँथॉलॉजिस्ट सल्लागार डॉ. किर्ती कोटला म्हणाले की, गेल्या दोन वर्षात 30 ते 40 वयोगटातील तरुण प्रौढांमध्ये कार्डियाक स्क्रीनिंगचे प्रमाण 20 टक्क्यांनी घटले आहे. स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही स्क्रीनिंग महत्वाचे आहे. तुमच्या गरजेनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या कार्डियाक चाचण्या केल्या जाऊ शकतात. कार्डियाक स्क्रीनिंग दरम्यान सामान्य चाचण्यांमध्ये रक्तदाब तपासणी, रक्तातील कोलेस्टेरॉल चाचणी, ईसीजी आणि इकोकार्डियोग्राम यांचा समावेश आहे. यातील प्रत्येक चाचण्या वेगवेगळ्या प्रकारचे जोखीम घटक किंवा हृदयरोगाची चिन्हे शोधण्यात मदत करतात.