तुम्हाला माहित आहे का आपल्या बोटांना का सुरकुत्या पडतात?
बोटांना सुरकुत्या पडत असतील तर काळजी करण्याची गरज नाही.
मुंबई : माणसांच्या हाताचे आणि पायांचे तळवे कोमल असतात. जेव्हा ते अधिक वेळ पाण्याच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांना सुरकुत्या पडतात. अनेकांनी अंघोळ, स्विमिंगनंतर किंवा भांडी घासल्यानंतर हे अनुभवलं असेल. थंड पाण्यापेक्षा गरम पाणी वापरल्यास असं जास्त होतं.
बोटांना सुरकुत्या का पडतात?
मज्जासंस्था रक्तवाहिन्यांना संकुचित होण्याचा संदेश देतात, तेव्हा असं घडतं. रक्तवाहिन्या संकुचित झाल्यानं बोटांवरील त्वचेचं आकारमान कमी होतं. त्यामुळे सुरकुत्या पडतात.
दरम्यान पाण्यामुळे बोटांना सुरकुत्या पडत असतील तर काळजी करण्याची गरज नाही. बोटं सुकल्यानंतर काही वेळाने ती जशी होती तशी होतात. मात्र पाण्याशी संपर्क न येता हातांना सुरकुत्या पडत असतील, तर मात्र डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. त्यांच्या सल्ल्यानुसारच उपचार करावेत. कारण आणखी काही कारणांमुळेही बोटांना सुरकुत्या पडू शकतात.
डिहायड्रेशन
डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता असते. ज्यामुळे त्वचा कोरडी आणि थंड होते. त्यामुळे बोटांना सुरकुत्या पडतात. वृद्ध, लहान मुलं आणि बाळांना डिहायड्रेशन होण्याची शक्यता जास्त असते. डिहायड्रेशन असल्यास थकवा, डोकेदुखी अशी लक्षणंही दिसतात. त्यामुळे हातांना सुरकुत्या पडण्यासह अशी लक्षणंही दिसत असतील. तर पुरेशा प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे.
Raynaud's disease
Raynaud's disease म्हणजे थंडाव्याबाबत अतिसंवेदनशीलता असणं. संपूर्ण शरीरासह बोटांना रक्तपुरवठा करण्याऱ्या रक्तवाहिन्यांवर याचा परिणाम होतो. थंड वातावरणात बोटं सफेद किंवा निळी पडतात. त्यांना मुंग्या येतात. बोटांवरील त्वचेला सुरकुत्या पडतात. Raynaud's disease ची लक्षणं दिसल्यास अशा लोकांनी थंड वातावरणापासून लांब राहावं. हात आणि पायात मोजे घालणे. तसंच डॉक्टरांचाही सल्ला घेणं.
एक्झेमा (Eczema)
एक्झेमा म्हणजे त्वचेला खाज, पुरळ येणं. त्वचा जळजळणं आणि लालसर होणं. एटोपिक डर्माटिस्ट हा जास्त काळ राहणाऱ्या एक्झेमाचा प्रकार आहे. याचा परिणाम हात, बोटे, गुडघ्यांच्या मागे आणि हाताच्या कोपऱ्यांमध्ये होतो. एक्झेमामुळे त्वचा रूक्ष होते, त्यामुळे सुरकुत्या पडतात. त्यामुळे एक्झेमाची इतर लक्षणं दिसल्यास डॉक्टरांना दाखवणं. त्यांच्या सल्ल्यानुसार सुरकुत्यांवर उपाय म्हणून क्रिम, साबण इत्यादीचा वापर करणं.
डायबेटिस
डायबेटिज असलेल्यांना त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. नखांभोवती आणि बोटांमध्ये बॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शनचा परिणाम होतो. त्यामुळे त्वचा लाल होते आणि सूजते. त्यामुळे सुरकुत्या पडू शकतात. डायबेटिज असलेल्या व्यक्तींना बोटांना सुरकुत्या पडत असतील, तर त्यांनी आपली त्वचा स्वच्छ आणि कोरडी ठेवण्याचा प्रयत्न करावा. सौम्य साबणाचा वापर करावा. त्वचेतील आद्रता टिकवून ठेवावा.