मुंबई : भारतीय लोकांच्या पारंपारिक जेवणात भाताचा हसखास समावेश असतो. तांदळाचा भात तयार करताना आपण तांदूळ धुवून घेतो. मात्र तुम्ही तांदूळ योग्य पद्धतीने धुताय ना? तुम्ही रोज तांदूळ धुण्यासाठी वापरत असलेली पद्धत योग्य आहे ना? कारण तांदळांमध्ये आर्सेनिकचं प्रमाण असतं.


तांदळात आर्सेनिकचं प्रमाण किती धोकादायक?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युरोपियन महासंघाच्या म्हणण्याप्रमाणे, आर्सेनिक विषारी असतो. यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याठिकाणी आर्सेनिकला कॅन्सरला कारणीभूत असणाऱ्या यादीमध्ये ठेवण्यात आलं आहे. 


तांदळात किती प्रमाणात असतं आर्सेनिक?


माती तसंच पाण्यामध्ये आर्सेनिक आढळतं. परिणामी तांदळामध्येही याचं प्रमाण दिसून येतं. आपण खात असलेल्या इतर पदार्थांच्या तुलनेत तांदळात याचं प्रमाण 20 पटीने अधिक असतं. 


बेलफास्टमधील क्विंन्स विद्यापीठातले प्रोफेसर अँड मेहार्ग यांनी याबाबत अभ्यास केला आहे. त्यांनी एका वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, आपण तांदळाचे प्रकार पाहिले तर खासकरून बासमती या तांदळाच्या प्रकारात आर्सेनिकचं प्रमाण कमी दिसून येतं. तर उलट ब्राऊन राईसमध्ये याचं प्रमाण अधिक असतं. जर ऑर्गेनिक शेती असेल तर अशा पिकवलेल्या तांदळामध्ये आर्सेनिकच्या स्तराचा फरक अधिक पडत नाही.


आजकाल अनेक जणं राईस मिल्क पिण्यावर भर देतात. प्रो. मोहार्ग यांच्या म्हणण्याप्रमाणे, पिण्याच्या पाण्यात जितकं आर्सेनिक असणं धोकादायक नसतं, त्यापेक्षा जास्त आर्सेनिक राईस मिल्कमध्ये असतं. 


भात खाणं किती सुरक्षित?


कमी जोखमीच्या कॅटेगरीमध्ये आर्सेनिकच्या प्रमाणाची गणना होते. फूट स्टँडर्ड्स एजन्सी या अमेरिकन संस्थेने याबाबत अहवाल दिलाय. या अहवालानुसार, ज्या व्यक्तीचं वजन 70 किलोहून अधिक आहे त्यांनी 100 ग्रॅम तांदळाचं सेवन केलं पाहिजे. 


तांदळचाही संतुलित आहारात समावेश असला पाहिजे. जे लोकं दररोज जास्त तांदळाचा वापर करतात त्यांच्यासाठी हे सेवन धोकादायक ठरू शकतं. 


कसा शिजवाल तांदूळ?


जर तांदूळ रात्रीच पाण्यात भिजवून ठेवला आणि दुसऱ्या दिवशी स्वच्छ धुवून शिजवला तर आर्सेनिकचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. भात उकळतानाही पाणी बदललं गेल्यास आर्सेनिकचं प्रमाण कमी होते. जर तुम्ही या पद्धतीने भात शिजवला तर आर्सेनिकचं प्रमाण 80 टक्क्यांनी कमी होऊ शकतं.


जागतिक आरोग्य संघटना आणि संयुक्त राष्ट्र खाद्य आणि कृषी संघटनेने तांदळातील आर्सेनिकच्या प्रमाणाबाबत 2014 मध्ये मार्गदर्शक तत्त्व जारी केली होती. तर युरोपियन महासंघाने लहान मुलांसाठी असलेल्या प्रोडक्समध्ये किती आर्सेनिक असलं पाहिजे याचं प्रमाणंही ठरवून दिलंय.