आता लस घेताना सुईच्या वेदना सहन कराव्या लागणार नाहीत!
शास्त्रज्ञांनी एक 3डी प्रिंटेड वॅक्सिन पॅच तयार केला आहे.
वॉशिंग्टन : लस घेताना तुम्हाला सुईची भीती वाटते का? सुईच्या भीतीने तुम्ही लस घेण्यास टाळाटाळ करताय...मग तुमच्यासाठी ही फार आनंदाची बातमी आहे..कारण लवकरच सुईशिवाय लस घेणं शक्य होणार आहे. अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी एक 3डी प्रिंटेड वॅक्सिन पॅच तयार केला आहे. ज्यामुळे वॅक्सिन घेणं अधिक सोपं होणार आहे. यामुळे लोकांच्या मनातील लसीची भीती आणि सुईच्या वेदना कमी होण्यास मदत होणारे.
स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठाने संयुक्तपणे हा वॅक्सिन पॅच विकसित केला आहे. त्याची चाचणी लवकरच सुरू होईल. या पॅचची पहिली चाचणी प्राण्यांवर होईल. शास्त्रज्ञांनी यासाठी अमेरिकेत मंजुरी मागितली आहे.
इम्यून रिस्पॉन्स अधिक जलद
शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की, हा लस पॅच हातात सुई असलेल्या लसीकरणापेक्षा 10 पट वेगाने इम्यून रिस्पॉन्स देतो. जेव्हा लस पॅचच्या मदतीने शरीरात पोहचते तेव्हा टी-सेल्स आणि अँटीबॉडीजचा रिस्पॉन्स हातावर घेतलेल्या लसीपेक्षा वेगवान असतो.
संशोधक म्हणतात, या पॅचच्या मदतीने ही लस थेट त्वचेच्या रोगप्रतिकारक पेशींपर्यंत पोहोचवता येते, आणि लस काम करण्यासाठी ही सर्वोत्तम स्थिती आहे. चाचणी दरम्यान, उंदराला पॅचच्या मदतीने लसीकरण करण्यात आलं आणि अँटीबॉडीचा रिस्पॉन्स खूप वेगवान होता.
कसं काम करत हे वॅक्सिन पॅच?
वॅक्सिन पॅचमध्ये अगदी बारीक 3D प्रिंटेड मायक्रोनीडल्स (सुया) असतात. हा पॅच त्वचेवर ठेवून ही लस देण्यात येते. अत्यंत सूक्ष्म सुईच्या मदतीने ही लस त्वचेद्वारे थेट शरीरात पोहोचते. सामान्य सुईच्या तुलनेत यामुळे जाणवलेली वेदना खूप कमी असते.
स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक जोसेफ एम डीसिमोन म्हणतात, तंत्रज्ञानाच्या बदलत्या युगात आपल्याला सुयांच्या भीतीमुळे होणारी अस्वस्थता कमी करणं आवश्यक आहे. यासह, लस डोसचे प्रमाण देखील कमी केले जाऊ शकतात. पॅचच्या मदतीने लोकांना लस दिली जाऊ शकते. विशेष गोष्ट अशी आहे की, एखादी व्यक्ती स्वतः देखील हे करू शकते.
सुईची भीती कमी करण्याचा प्रयत्न
अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया रिव्हरसाइडमधील शास्त्रज्ञ अशा प्रकारची वनस्पती विकसित करत आहेत, जे खाल्ल्यानंतर मानवी शरीरात लस पोहोचेल. त्याची सुरुवात कोविड लसीने होईल. जर तुम्हाला सोप्या भाषेत समजवायचं झालं तर लोकांना कोविडची लस त्यांना रोपं देईल. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, रोपांद्वारे लस पोहोचवणं हे आमचे ध्येय आहे, यासाठी आम्ही आमच्या बागेत पालक आणि लेट्युसचं झाड लावलं आहे.
सुईच्या भीतीने 10 टक्के लोकं वॅक्सिन घेत नाहीत
सुयांच्या भीतीमुळे 10 टक्के लोकं लस घेत नाही. एका सर्वेक्षणात हे समोर आलं होतं. सुईच्या भीतीला ब्लड-इंजेक्शन इंजरी म्हणतात. यापासून ग्रस्त लोकांमध्ये, सुईच्या नावाने रक्तदाबाची समस्या, चिंताग्रस्तपणा आणि अस्वस्थता वाढते. बऱ्याच प्रकरणांमध्ये, व्यक्ती अगदी बेशुद्धही होऊ शकतो.