बेळगाव : दोन हजार रुपयांच्या जपळपास1 कोटी 81 लाख रुपयांच्या बनावट नोटा बेळगाव पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या नोटा तथाकथित सामाजिक कार्यकर्त्याकडून जप्त करण्यात आल्यात. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून मुद्दे मालासहीत काही साहित्यही जप्त करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असिफ शेख  (वडगाव, बेळगाव) आणि रफीक देसाई (श्रीनगर, बेळगाव) या दोघांना बनावट नोटा प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. ही जोडगोळी लॅपटॉप आणि कलर प्रिंटरचा वापर करून दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा तयार करून बाजारपेठेत वितरीत करत असे. या जोडगोळीच्या या गोरख धंद्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली.


अटक करण्यात आलेल्या रफीक देसाई हा स्वत:ला सामाजिक कार्यकर्ता म्हणून घेत होता. त्याने सामाजिक कार्यायाच्या नावाखाली बनावट नोटांचा गोरख धंदा सुरु ठेवला होता. तो जिल्हा इस्पितळ आवारात गोरगरिब रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत अन्नदान करून तो अन्नदाता म्हणून स्वतःला पुढे आणत होता. याआधी भामटेगिरी आणि फसवणूकीचा आरोप करीत काही महिलांनी रफीकला अर्धनग्न करून त्याची धिंड काढली होती. त्यावेळी त्याने त्यावेळी एका आमदाराकडे बोट दाखवले होते. ते आपल्याला गोवण्यासाठी हा डाव रचल्याचा आरोप केला होता. मात्र, यावेळी त्याचा डाव उघड झालाय.


पोलिसांनी रफिकला बनावट नोटा प्रकरणी अटक केल्याने त्याचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. या प्रकरणात आणखी काही लोकांचा सहभाग असण्याची शक्यता असल्याने हे प्रकरण अधिक तपासासाठी सीओडीकडे सोपविण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. पोलीस आयुक्त डॉ. डी. सी. राजप्पा आणि उपायुक्त सीमा लाटकर यांनी बनावट नोटा आणि साहित्य जप्त केल्याची माहिती दिली.