पाटणा : बिहारची राजधानी पाटणामध्ये भिकाऱ्याला पाच रुपयांची भिक देणं एका ठेकेदाराला भलतंच महागात पडलंय. पाच रुपयांची भिक द्यायच्या नादात या ठेकेदाराला आपले १० लाख रुपये गमवावे लागलेत. अजय कुमार सिंह असं या ठेकेदाराचं नाव आहे. ही घटना घडलीय कृष्णापुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचं झालं असं की, ठेकेदार अजय कुमार सिंह यांनी कॅनरा बँकेतून १० लाख रुपयांची रोकड काढली होती. यावेळी आपल्यावर कुणाचं तरी लक्ष आहे हे त्यांच्या ध्यानातदेखील आलं नाही... आणि इथेच त्यांचं चुकलं.


तक्रारदार अजय कुमार सिंह

अजय कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी तीन वाजल्याच्या सुमारास ही घटना घढली. बँकेतून पैसे काढल्यानंतर ते आपल्या गाडीतून घरी जात होते. तेव्हा एक भिकारी महिला त्यांच्या गाडीजवळ उभी राहून त्यांच्याकडे भिक मागू लागली. अजय कुमार यांनी ठेकेदार महिलेला पाच रुपये दिले. 


परंतु, यावेळी एका अज्ञात व्यक्तीनं त्यांचे पैसे गाडीबाहेर पडल्याचं त्यांना सांगितलं... अजय कुमार सिंह यांनी गाडीतून उतरून खाली पाहण्याचा प्रयत्न केला. 


पण एवढ्यात ती अज्ञात व्यक्ती अजय कुमार सिंह यांच्या गाडीच्या मागच्या सीटवर ठेवलेली पैशांची बॅग उचलून फरार झाली. 


अजय कुमार यांनी यासंदर्भात कृष्णापुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीय. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे गुन्हेगारांचा तपास करत आहेत.