105 कोटींचा घोटाळा करणारी महिला IAS अधिकारी अटकेत; जावयाबरोबर...
IAS Sewali Devi Sharma: मागील अनेक दिवसांपासून पोलीस या महिला आधिकाऱ्याच्या मागावर होते. या महिला आयएएस अधिकाऱ्याने सरकारच्या मालकीचे 105 कोटी रुपये परस्पर बँकेतून काढून घेतले. तेव्हापासूनच पोलीस या महिलेच्या मागावर होते.
IAS Sewali Devi Sharma Scam: आसाममधील 105 कोटींच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी तपास करणाऱ्या पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. 105 कोटींच्या घोटाळ्यामध्ये फरार असलेल्या 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणामधील प्रमुख आरोपी असलेली निलंबित महिला आयएएस अधिकारी सेवाली देवी शर्माला (Sewali Devi Sharma) पोलिसांनी अटक केली आहे. सेवालीबरोबरच तिचा जावई अजीतपाल सिंग आणि अन्य 3 आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. आसाम पोलिसांनी राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यामधून या 5 जणांना अटक केली आहे. या प्रकरणामध्ये नाव समोर आल्यानंतर सेवाली देवी ही तिचा जावई, मोलकरणी आणि अन्य 3 लोकांबरोबर अजमेरमधील एका हॉटेलमध्ये लपून बसली होती. येथील क्रॉस लेन नावाच्या हॉटेलवर स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापेमारी करुन आसाम पोलिसांनी सेवाली देवीला ताब्यात घेतलं
अटक करुन आसामकडे रवाना
समोर आलेल्या माहितीनुसार सेवाली देवी आणि तिचे सहकारी 3 दिवसांपूर्वीच अजमेरमध्ये आली होती. सेवाली देवी अजमेरमध्ये असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाल्यानंतर आसाम पोलिसांची एक तुकडी अजमेरमध्ये दाखल झाली. त्यानंतर क्रॉस लेन हॉटेलवर पाळत ठेऊन, पहारा देऊन सोमवारी सकाळी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. सेवाली देवी आणि तिच्या साथीदारांना अटकेनंतर तातडीने अजमेरमधील कोर्टात हजर करण्यात आलं. या पाचही जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आसाम पोलीस या आरोपींना घेऊन आपल्या राज्याकडे रवाना झाले आहेत.
105 कोटींचा नेमका घोटाळा काय...
आयएएस अधिकारी राहिलेल्या सेवाली देवी शर्माने सन 2017 आणि 2020 दरम्यान राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या म्हणजेच SCERT च्या कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. पदावर असताना सेवाली देवीने सरकारची परवानगी न घेता 5 बँक खाती सुरु केली. त्यानंतर कंत्राटदार म्हणून काम करणाऱ्या आपल्या जावयाच्या म्हणजेच अजीतपाल सिंगच्या मदतीने सरकारी पैसा या खात्यांवर वळवला. कोणत्याची कामाची निविदा सादर न करता सेवाली देवीने या 5 बँक खात्यांवरुन सरकारच्या मालकीचे तब्बल 105 कोटी रुपये काढून घेतले.
प्रकरण समोर आल्यानंतर...
हे प्रकरण नंतर समोर आल्यानंतर आसाम सरकारने तातडीने आयएएस पदावर असलेल्या सेवाली देवी शर्मा यांना निलंबित केलं. या प्रकरणामध्ये आसाममध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला. त्यानंतर अटकेच्या भितीने सेवाली देवी राज्यातून फरार झाली. मागील अनेक दिवसांपासून पोलीस तिच्या मागावर होते. अखेर राजस्थानमधील अजमेर येथे सेवाली देवी तिच्या साथीदारांबरोबर पोलिसांच्या हाती लागली.