कर्नाटकात प्रसादातून विषबाधा; ११ जणांचा मृत्यू
प्रसाद सेवन केल्यानंतर अनेकांना उलट्या आणि पोटात दुखायला लागले.
बंगळुरू: कर्नाटकच्या चामराजनगर जिल्ह्यात शुक्रवारी धार्मिक कार्यक्रमातील प्रसादातून झालेल्या विषबाधेत ११ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. आणखी ८० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापैकी १२ लोकांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी म्हैसूरला हलवण्यात आलेय. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. स्थानिक जिल्हा अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, प्रसादात विष कालवण्यात आल्याची शक्यता आहे.
येथील सुलीवडी गावात या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसाद सेवन केल्यानंतर अनेकांना उलट्या आणि पोटात दुखायला लागले. त्यामुळे या लोकांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
या घटनेनंतर कर्नाटक सरकारने मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची आर्थिक मदत जाहीर केली. तर उर्वरित पीडितांच्या उपचाराचा खर्च सरकार उचलणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी केली.