ओडिशात भीषण अपघात! समोरासमोर धडक होऊन दोन बसेसचा अक्षरश: चुराडा; 12 प्रवासी जागीच ठार
ओडिशामधील (Odisha) गंजम (Ganjam) येथे दोन बसेसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 10 प्रवासी ठार झाले असून, 8 जण जखमी झाले आहेत. राज्य सरकारी आणि खासगी बसमध्ये धडक होऊन हा भीषण अपघात झाला.
ओडिशामधील (Odisha) गंजम (Ganjam) जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. सोमवारी पहाटे दोन बसेसची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला आहे. अपघात इतका भीषण होता की, 10 प्रवासी ठार झाले असून 8 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 6 पुरुष, 4 महिला आणि 2 अल्पवयीन आहेत. जखमींना तात्काळ एमकेसीजी मेडिकल कॉलेजात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. गंजम जिल्ह्यातील दिगापहांडी पोलीस हद्दीत ओडिशा राज्य मार्ग परिवहन महामंडळच्या (OSRTC) आणि एका खासगी बसमध्ये हा अपघात झाला.
ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, गंजमचे जिल्हा दंडाधिकारी दिव्या ज्योती परिदा यांनी अपघातातील सर्व जखमींना उपचारासाठी एमकेसीजी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं असल्याची माहिती दिली आहे. "दोन बसची धडक होऊन 10 प्रवासी ठार झाले आहेत. जखमींना एमकेसीजी वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. याप्रकरणी तपास सुरु आहे. जखमींना आम्ही शक्य ती सर्व मदत देत आहोत," असं दिव्या ज्योती परिदा यांनी सांगितलं.
गंभीर जखमींना कट्टक येथील एससीबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं.
अपघाताबद्दल माहिती देताना पोलीस महानिरीक्षक सरवना विवेक यांनी सांगितलं की, "प्राथमिकदृष्ट्या दोन्ही बसेसची समोरासमोर धडक झाल्याचं दिसत आहे. मध्यरात्री 1 च्या सुमारास हा अपघात झाला. खासगी बसमधील अनेक प्रवासी ठार आणि जखमी झाले आहेत. सरकारी बसमधील प्रवासी मात्र किरकोळ जखमी आहेत".
राज्य सरकारी बस रायगडाहून भुवनेश्वरला जात असताना, खासगी बस जिल्ह्यातील खंडादेउली गावातून लग्नाचे वराती बेरहामपूरहून परतत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक, 3 लाखांची मदत जाहीर
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी अपघाता मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली वाहत शोक व्यक्त केला आहे. तसंच मृतांच्या नातेवाईकांना 3 लाखांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नवीन पटनायक यांनी जखमींना मोफत उपचार देण्याचे आदेश दिले असून ते लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी वित्तमंत्री विक्रम अरुख आणि गंजम डीपीसीसीचे अध्यक्ष आणि आमदार विक्रम पांडा यांना तातडीने घटनास्थळी जाऊन पीडितांना मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.