हुबळी: संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या काळात भारतीय लष्कराने १२ सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे यांनी केला. हुबळीतील एका प्रचारसभेनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, युपीए सरकारच्या दहा वर्षांच्या काळात १२ सर्जिकल स्ट्राईक झाले. मात्र, त्याचे कधीही राजकारण करण्यात आले नाही. मात्र, सध्याचे सरकार शहीदांच्या मृतदेहावरूनही राजकीय डावपेच खेळत असल्याचा आरोप खरगे यांनी केला. 
 
काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाच वर्षांच्या काळात भारतीय वायूदलाने तीन एअरस्ट्राईक केल्याचा दावा केला होता. त्या पार्श्वभूमीवर मल्लिकार्जून खरगे यांनी हे विधान केल्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरून भाजप व काँग्रेसमध्ये नव्याने शाब्दिक युद्ध रंगण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी खरगे यांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरूनही मोदी सरकारला लक्ष्य केले. त्यांनी म्हटले की, २०१४ च्या निवडणुकीत १० कोटी नोकऱ्यांचे आश्वासन देणाऱ्या भाजपाच्या काळात गेल्या चार नोकऱ्यांची कपात झाली आहे. नव्या नोकऱ्या निर्मिती झाली नाही. एनएसएसओच्या अहवालानुसार, देशभरात तब्बल ३८ लाख नोकऱ्या कमी झाल्या आहेत. तर केवळ २७ लाख नोकऱ्या निर्माण झाल्या. मग मोदींच्या १० कोटी रोजगाराच्या आश्वासनाचे काय झाले, असा सवालही खरगे यांनी उपस्थित केला. 


२०१६ साली उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून नियंत्रण रेषेलगतचे दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. यानंतर नुकत्याचा झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यालाही भारतीय सैन्याने अवघ्या १२ दिवसांत प्रत्युत्तर दिले होते. यावेळी भारतीय वायूदलाने बालाकोट परिसरातील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर हवाई हल्ला केला होता.