Crime News : दिल्लीच्या गाझीयाबाद (Ghaziabad crime news) येथील जेष्ठ दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी महत्त्वाचा खुलासा झाला आहे. गाझीयाबादच्या लोनी दौलतनगर कॉलनीत 21 नोव्हेंबर रोजी भंगाराचे व्यापारी इब्राहिम (62) आणि त्यांची पत्नी हाजरा (58) यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती. चार भंगार विक्रेत्यांनी 50 हजार रुपयांसाठी दोघांची हत्या केली होती. या चार आरोपींमध्ये मुख्य सुत्रधाराला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात 12 वर्षाच्या आरोपीला अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भंगार विकणाऱ्या दाम्पत्याची हत्या


आरोपींनी जेष्ठ दाम्पत्याची गळा दाबून हत्या केली होती. दोघांचेही मृतदेह घरात वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इब्राहिम आणि त्यांची पत्नी हाजरा दोघेही भंगाराचा व्यवसाय करत होते. 25 दिवसांनंतर पोलिसांना या प्रकरणातील मुख्य सुत्रधाराला पकडण्यात यश आले आहे. 12 वर्षाच्या मुलाने हे कृत्य केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. हा आरोपी या दाम्पत्याकडे भंगाराची विक्री करण्यासाठी येत होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार पैशासाठी ही हत्या करण्यात आली होती.


शेजाऱ्याने दिली माहिती


सुरुवातीला पोलिसांना या दाम्पत्याच्या कोणी जवळच्या व्यक्तीनेच ही हत्या केल्याचे वाटत होते. 12 जणांच्या तपासानंतरही पोलिसांना कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर पोलिसांना शेजारच्या व्यक्तीने 12 वर्षाच्या मुलाबद्दल माहिती दिली. पोलीस आयुक्त डॉ. ईरज राजा यांनी सांगितले की, योग्य माहितीच्या आधारे पोलिसांनी 12 वर्षाच्या मुलाला ताब्यात घेतलं आणि चौकशी केली. यानंतर त्याच्या आणखी एका साथीदाराला अटक केली.


शेजारी राहणाऱ्या मुलीला कल्पनाही नाही


पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून सुमारे 12 हजार रुपये, मोबाईल आणि गळ्यातील चेन असा ऐवज जप्त केला आहे. दाम्पत्याच्या घरातून 50 हजार रुपये, मोबाईल फोन आणि दागिने गायब झाले होते. घटनेच्या वेळी या दाम्पत्याची मुलगी रहिमा आणि तिची सहा मुले शेजारच्या घरात राहत होती. आम्हाला या घटनेची माहिती नव्हती असे त्यांनी पोलिसांना सांगितले.


पैसे लुटण्यासाठी हत्या


घटनेच्या आधी एक दिवस आधी आरोपी मुलगा वृद्ध दाम्पत्याच्या घरी भंगार विकण्यासाठी गेला होता. इब्राहिम यांना त्याने मोठ्या प्रमाणात रद्दी विकताना पाहिले होते. त्यामुळे त्यांच्याजवळे पैसा लुटता येतली असे त्याला वाटले. त्यानंतर अल्पवयीन मुलाने आणखी तीन साथीदारांच्या मदतीने त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला. भंगार विकण्याच्या बहाण्याने त्यांनी दाम्पत्याला दरवाजा खोलायला लावला. दरवाजा उघडताच वृद्ध महिलेची त्यांनी गळा दाबून हत्या केली. त्यानंतर झोपेत असलेल्या इब्राहिम यांचीही हत्या केली.


12 वर्षाच्या मुलावर कसा आला संशय?


दुहेरी हत्याकांडानंतर काही दिवसांनी या दाम्पत्याच्या घरी 12 वर्षांचा मुलगा पुन्हा गेला होता. तिथे जाताच त्याने ढसाढसा रडण्यास सुरुवात केली. त्याच्या डोळ्यातील अश्रू पाहून दाम्पत्याचे कुटुंबीयच नव्हे तर शेजारीही हैराण झाले. कारण हा मुलगा त्यांच्या कुटुंबातीलही नव्हता. तो मोठमोठ्याने आता मी कोणाला सळई विकणार असे म्हणत होता. तेव्हाच शेजाऱ्याने त्याला ओळखले. रडण्याचे नाटक करणाऱ्या या मुलाने घटनेच्या दोन-तीन दिवसांपूर्वी इब्राहिमकडे येऊन रद्दी विकल्याचे शेजाऱ्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने सर्व हकीकत सांगितली.