Ananad Mahindra: देशातील दिग्गज उद्योजक आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. अनेकदा ते ट्विटर (एक्स)वर नवीनवीन आयडिया व अपडेट शेअर करत असतात. इतकंच नव्हे तर, देशात घडणाऱ्या घडामोडींबद्दलही ते मत व्यक्त करत असतात. एखाद्याचे कौतुक करण्याची संधीही ते सोडत नाहीत. तरुणाईंमध्ये आनंद महिंद्रा हे खूप लोकप्रिय आहेत. अलीकडेच त्यांनी केलेले एक ट्विट लक्ष वेधून घेत आहेत. त्यांनी 13 वर्षांच्या मुलीला थेट नोकरीची ऑफर दिली आहे. काय घडलं नेमकं? जाणून घ्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आनंद महिंद्रा यांनी शनिवारी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी  13 वर्षांच्या मुलीच्या शौऱ्याची कहाणी सांगितली आहे. या मुलीने प्रसंगावधान राखत तिच्या लहान बहिणीचा जीव वाचवला आहे. निकीता असं या मुलीचं नाव आहे. निकीताच्या या धाडसाचे आनंद महिंद्रा यांनी कौतुक करत त्यांना थेट नोकरीची ऑफर दिली आहे. निकीता ही उत्तर प्रदेशची रहिवाशी आहे. 


काय घडलं नेमकं? 


उत्तर प्रदेशच्या बस्तीयेथील ही घटना आहे. 13 वर्षांच्या निकिताने अॅलेक्सा डिव्हाइसच्या मदतीने घरातून माकडांना हुसकावून लावले आहे. इतकंच नव्हे तर तिच्या प्रसंगावधानाने तिने 15 महिन्यांच्या बहिणीचे प्राणही वाचवले आहेत. निकिता जेथे राहते त्या भागात माकडांचा उच्छाद आहे. त्यांच्या घरी पाहुण आले होते. मात्र, त्यांच्याकडून चुकून घराचा गेट खुला राहिला. त्यातून काही माकडं घरात घुसली त्यांनी घरातील वस्तु फेकण्यास सुरुवात केली. तिथेच निकिताची लहान बहिण खेळत होती. माकडं बाळाकडे जास असतानाच निकिताने प्रसंगावधान राखत अॅलेक्सा या डिव्हाइसला कमांड करत कुत्र्याचा आवाज प्ले करण्यास सांगितला. 



माकडं बाळाकडे जात असताना अॅलेक्सामधून कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज आला. कुत्र्यांच्या आवाजामुळं माकडं घाबरुन खोलीतून पळाले. मुलीच्या प्रसंगावधानामुळं माकडं खोलीतून पळाले. मुलीने स्वतःबरोबरच आपल्या लहानग्या बहिणीचाही जीव वाचवला आहे. निकीताच्या या धाडसाचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे. अनेकांनी तिच्या मुलाखतीदेखील घेतल्या आहेत. आनंद महिंद्रा यांनीही या मुलीचे कौतुक करत ट्विट करत हा प्रसंग शेअर केला आहे. 


आनंद महिंद्रा यांनी या मुलीचे कौतुक करताना म्हटलं आहे की, या युगात आपण तंत्रज्ञानाचे नोकर होणार की मालक हा प्रश्न आहे. पण या मुलीच्या प्रसंगावधानाने तंत्रज्ञान हे नेहमीच मानवी बुद्धीला प्रोत्साहन देणार आहे. तिचे प्रसंगावधान असाधारण आहे. या मुलीमध्ये नेतृत्व गुण आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर जर या मुलीला कॉर्पोरेट क्षेत्रात येण्याचा विचार करत असेल तर आम्ही तिला संधी देऊ इच्छितो. महिंद्रा राईजमध्ये ती आमच्यासोबत काम करु शकते, असं म्हणत महिंद्रा यांनी तिला नोकरीची ऑफर देऊ केली आहे.