उत्तर प्रदेशात पावसाचा हाहाकार, १५ बळी तर १३३ इमारती कोसळल्या
उत्तर प्रदेशातील १४ जिल्ह्यांना जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. पावसाचे १५ जण बळी गेले आहे.
लखनऊ : उत्तर प्रदेशातील १४ जिल्ह्यांना जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. पावसाने १५ जणांचे बळी घेतले आहेत. गेल्या चार दिवसात जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसात २३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर १३३ इमारतींना धोका पोहोचला असून त्या कोसळल्या आहेत. ९ जुलैपासून चार दिवस पाऊस कोसळत आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) शनिवारीपासून पुढील पाच दिवस जोरदार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे.
उन्नाव, आंबेडकर नगर, प्रयागराज, बाराबंकी, हरदोई, खिरी, गोरखपूर, कानपूर नगर, पिलीभीत, सोनभद्र, चंदोली, फिरोजाबाद, माऊ आणि सुल्तानपूर जिल्ह्यात मोठी नैसर्गिक हानी झाली आहे. हवामान विभागाने उत्तराखंड, पूर्व उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा, तटीय कर्नाटक, अरुणाचल प्रदेश आणि नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा येथे शनिवारी जोरदार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे.
९ जुलै ते १२ जुलै या चार दिवसांत मुसळधार पाऊस झाला. यात १५ जणांचा मृत्यू , २३ जनावरे दगावली असून १३३ इमारतींची पडझड झाल्याचे प्रशासकीय यंत्रणेकडून सांगण्यात आले. वादळी पावसाचा तडाखा अनेक जिल्ह्यांना बसला. अजून दोन दिवस ढगाळ वातावरणच राहणार असून विजांच्या गडगडाटासह आज शनिवारी आणि पुढील चार ते पाच दिवस पाऊस कोसळेल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. तसेच बिहार राज्यातही पाऊस कोसळत आहे.
दरम्यान, आसाम राज्यातही पूर असून मिझोरामलाही पुराने वेढले आहे. अनेक गावे आणि घरे पाण्याखाली गेली आहेत. येथील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे.