सरकारी रुग्णालयात 15 जणांचा मृत्यू; ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे जीव गेल्याचा आरोप
आंध्र प्रदेशातील सरकारी रुग्णालयात शनिवारी 15 कोरोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
हैद्राबाद : आंध्र प्रदेशातील सरकारी रुग्णालयात शनिवारी 15 कोरोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. रुग्णालयातील ऑक्सिजन संपल्यामुळे या कोरोना रुग्णांचा जीव गेल्याची माहिती मिळतेय. रुग्णालय प्रशासनाने या आरोपांचे खंडन केले आहे. जिल्हाधिकांऱ्यांनी रुग्णालयाचा दौरा केल्यानंतर अफवा पसरवणाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
अनंतपूर येथील सरकारी रुग्णालयात जिल्हाधिकाऱ्यांनी दौरा केला. आमच्या टीमने ऑक्सिजन प्लांटची तपासणी केली आहे. आम्ही प्रत्येक वार्डचा दौरा केला. सर्व ऑक्सिजन सप्लाय योग्य रित्या सुरू आहे. कुठेही लिकेज नाही. ऑक्सिजनच प्लांटचे प्रेशर योग्य आहे. असे जिल्हाधिकारी निशात कुमार यांनी सांगितले.
आज झालेल्या मृत्यूंचा ऑक्सिजनशी काही संबध नाही. रुग्णालयात 15 मृत्यू झाले आहेत. त्यांचे वय जास्त होते आणि काहींना सहव्याधी होत्या. आम्ही व्यक्तीशः तपासले आहे की, हे मृत्यू ऑक्सिजनमुळे झालेले नाही. असं प्रशासनानं म्हटलं आहे.
शनिवारी एक व्हिडिओ बनवला गेला. ज्यात रुग्णांच्या मृत्यूला प्रशासनाला जबाबदार ठरवण्यात आले. हे मृत्यू ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे झाल्याचे व्हिडिओत म्हटले.
'अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे प्रशासनाने म्हटले आहे. 20 दिवस आधीच पूर्ण ऑक्सिजन पाइपलाइन सिस्टिम तपासण्यात आली होती. फायर सेफ्टीसुद्धा योग्यरित्या तपासली जात असल्याचे' जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.