दिलासा देणारी बातमी । देशभरात आतापर्यंत कोरोनाचे १५१४ रुग्ण बरे
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भावावर अद्याप नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही. मात्र, काही प्रमाणात कोरोनावर मात करण्यात यश आहे.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भावावर अद्याप नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही. मात्र, काही प्रमाणात कोरोनावर मात करण्यात यश आहे. गेल्या २४ तासात ८२६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १३ हजारांच्या घरात कोरोनाबाधित भारतात आहेत. तर कोरोनामुळे देशभरात ४२० जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाबाधितांची सर्वाधिक संख्या ही महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू आणि राजस्थानात आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या मते देशातील कोविड-२०१९ च्या ताज्या स्थितीच्या आढाव्यानुसार देशात एकूण १२,७५९ कोरोना बाधित रुग्ण आहेत. तर संशयित १०,८२४ आहेत. आतापर्यंत १५१४ लोक बरे झाले आहेत. तर ४२० जणांना मृत्यू झाला आहे.
तर महाराष्ट्र राज्यात २८६ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. राज्यात काल दिवसभरात ७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या ३२०२ वर पोहोचली आहे. मुंबईतही १७७ रुग्ण वाढलेत. मुंबईत रुग्णांची संख्या २०७३वर पोहोचली आहे. राज्यात आत्तापर्यंत कोरोनाचे १९४ बळी गेले आहेत.