देशात कोरोनाचे १९९३ नवे रुग्ण; कोरोनाबाधितांच्या संख्येने ३५ हजारांचा टप्पा ओलांडला
महाराष्ट्र हे सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे.
नवी दिल्ली: गेल्या २४ तासांमध्ये देशभरात कोरोना व्हायरसची (Coroanvirus) लागण झालेले १९९३ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येने ३५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये उपचार सुरु असलेले २५,००७ आणि कोरोनातून बऱ्या झालेल्या ८,८८८ रुग्णांचा समावेश आहे. तर कोरोनामुळे देशात आतापर्यंत १,१४७ लोकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, महाराष्ट्र हे सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. महाराष्ट्रात गुरुवारी कोरोनाचे ५८३ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १०, ४९८ इतका झाला आहे.
तर कोरोना रुग्णांच्या संख्येत गुजरात हे दुसऱ्या स्थानावर आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत कोरोनाच्या ४,३९५ रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी ६१३ जण बरे झाले आहेत. तर २१४ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.
याशिवाय, दिल्लीत आतापर्यंत कोरोनाचे ३,५१५ रुग्ण आढळून आले होते. यापैकी १०९४ लोक उपचारानंतर बरे झाले. तर ५९ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
तर गोवा, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आणि मणीपूर या राज्यांमधील कोरोनाचे सर्व रुग्ण बरे झाले आहेत. तसेच याठिकाणी गेल्या २४ तासांत एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालावधी ३ मे रोजी संपुष्टात येत आहे. यानंतर देशाच्या काही भागांतील निर्बंध शिथील केले जाण्याची शक्यता आहे.
तसेच केंद्र सरकारने नागरिकांना राज्यांतर्गत प्रवासाचीही मुभा दिली आहे. यामुळे गावची ओढ लागलेल्या शहरातील हजारो नागरिकांचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारने या स्थलांतराबाबतची कार्यपद्धती निश्चित केली आहे. सर्व जिल्हाधिकारी या प्रक्रियेचे प्रमुख असतील. या संपूर्ण प्रक्रियेवर मंत्रालयातील नियंत्रण कक्षाद्वारे देखरेख ठेवण्यात येईल.