VACCINATION : देशात विक्रमी लसीकरण, एका दिवसात 2 कोटी लोकांना डोस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने देशभरात मेगा वॅक्सिनेशन कार्यक्रम राबवण्यात येत आहे
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा आज वाढदिवस आहे. पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाकडून मेगा वॅक्सिनेशन कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत लसीकरणासदंर्भात नवीन विक्रम करण्यात आला आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तब्बल 2 कोटी लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. देशात लसीकरणाचा आतापर्यंतचा हा उच्चांक आहे. यानिमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी देशवासियांचं अभिनंदन केलं आहे.
दर तासाला 19 लाख लोकांना लस दिली जात आहे. जवळजवळ प्रत्येक सेकंदाला 527 आणि प्रत्येक मिनिटाला 31 हजार लोकांना लसीचे डोस देण्यात आले. यासाठी देशात 1 लाख 9 हजार 686 लसीकरण केंद्रं सुरू करण्यात आली आहेत. जास्तीत जास्त लोकांना लसीकरण केंद्रांवर नेण्याची मोहीमही भाजपकडून राबवली जात आहे.
देशात कोरोनाविरूद्ध सुरू असलेल्या लसीकरणाचा वेग पाहता लवकरच लसीकरणाचा आकडा 100 कोटींच्या पुढे जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत देशात कोरोना लसीचे शंभर कोटी डोस दिले जाऊ शकतात. यामध्ये लसीचे पहिले आणि दुसरे डोस दोन्ही समाविष्ट आहेत.
सेवा आणि समर्पन दिन
पंतप्रधान मोदींचा वाढदिवस भाजपाकडून सेवा आणि समर्पण दिन म्हणून साजरा केला जात आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सेवा आणि समर्पण मोहिमेची सुरुवात दिल्लीतील पक्ष कार्यालयातून केली. यावेळी जेपी नड्डा म्हणाले की, लोकसहभागाचा नवा अध्याय लिहिला जात आहे. लोकांचा विकास करणे हे पंतप्रधान मोदींच्या जीवनाचे ध्येय आहे. जनतेला समर्पित करणे हा पंतप्रधान मोदींचा स्वभाव आहे.