आता प्लॅटफॉर्मही सुरक्षित नाही! थेट वेटिंग रुममध्ये घुसली मालगाडी; दोघांना चिरडले
Odisha Train Accident : ओडिशातील जाजपूर जिल्ह्यात झालेल्या रेल्वे अपघातात दोघांचा मृत्यू झाला. रुळावरून घसरलेली मालगाडी प्रवाशांसाठी असलेल्या वेटिंग हॉलमध्ये घुसल्याचे सांगण्यात येत आहे.
Odisha Train Accident : रेल्वे अपघाताच्या अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असतील. पण कधी मालगाडी (goods train) थेट रेल्वे प्लॅटमॉर्फवरच आल्याचे वाचले नसेल. असाच काहीसा प्रकार ओडिशामध्ये (Odisha) घडलाय. ओडिशात सोमवारी सकाळी झालेल्या रेल्वे अपघातात दोघांचा मृत्यू झाला. ही घटना जाजपूर जिल्ह्यातील कोरेई स्टेशनवर घडली. रेल्वे रुळावरून घसरलेली मालगाडी सकाळी 6.40 च्या सुमारास प्रवाशांसाठी असलेल्या वेटिंग हॉलमध्ये घुसली. यादरम्यान अनेक जण गंभीर जखमीही झाले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर दोन रेल्वे मार्ग विस्कळीत झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे सर्व अधिकारी पोहोचले आहेत. रुळांवरील डब्बे हटवण्यात येईपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एक मालगाडी थेट स्टेशनच्या फलाटावर चढली. या घटनेत रेल्वेचे 8 हून अधिक डबे रुळावरून घसरले. या अपघातात लहान मुलांसह अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, बोगीखाली इतर लोकही अडकल्याची भीती आहे. त्यामुळे घटनास्थळी मोठी बचाव मोहीम सुरू आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हण्यानुसार, "रेल्वे स्टेशनवरुन जाताना मालगाड्यांचा वेग हा साधारणपणे कमी असतो. मात्र या मालगाडीचा वेग जास्त होता. अपघात इतका भयंकर होता काही डबे हे पादचारी पुलावर आदळले."
दरम्यान, जाजपूरचे पोलिस अधीक्षक राहुल पीआर यांनी सांगितले की, कोरेई स्टेशनवर बलौर-भुवनेश्वर डेमूमध्ये चढण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवासी थांबले होते, तेव्हा एक वेगवान मालगाडी अचानक रुळावरून घसरली आणि तिचे अनेक डबे प्लॅटफॉर्मवर आदळले.