पणजी : गोवा मंत्रीमंडळात फेरबदल झाले आहेत. आजारी असल्यामुळे उपचार घेत असलेल्या फ्रान्सिस डिसुझा आणि पांडुरंग मडकईकर यांना मंत्रीमंडळातून हटवण्यात आलं आहे. तर मिलिंद नाईक आणि निलेश काब्राल यांची त्यांच्या जागी वर्णी लागली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गोव्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा होत्या. तिकडे काँग्रेसने देखील सत्ता स्थापनेचा दावा केला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनोहर पर्रिकर हेच गोव्याचे मुख्यमंत्री राहतील यावर रविवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिक्कामोर्तब केला होता. गेल्या काही महिन्यांपासून पर्रिकर यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. या कारणामुळे त्यांना बहुतांश काळ रुग्णालयामध्ये राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यात सत्ताबदल किंवा नेतृत्वबदल होणार असल्याची चर्चा सातत्याने सुरु होती. 


मात्र, अमित शहांच्या निर्णयामुळे या सर्व शक्यतांना पूर्णविराम मिळाला आहे. अमित शहांनी भाजपच्या कोअर कमिटीशी चर्चा करुन हा निर्णय घेतला. कोअर कमिटीने पर्रिकर यांच्या नावावरच शिक्कामोर्तब केले होते.