200 Crore Rupees On Workers Account: मजुरी करणाऱ्या व्यक्तीच्या बँक खात्यावर तब्बल 200 कोटी रुपये जमा करण्यात आल्याचा धक्कादाय प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी या मजुराची चौकशी करण्यासाठी त्याचं घर गाठलं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर हे खातं गोठवलं असून त्यावरुन कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. गुजरात पोलिसांच्या सांगण्यावरुन खातं गोठवण्याची कारवाई करण्यात आली आहे. 


अचानक आले पैसे पण...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरियाणामधील चरखी-दादरी येथे राहत असलेल्या विक्रम नावाच्या व्यक्तीच्या खात्यावर 200 कोटी रुपये जमा झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात विक्रमच्या खात्यावर पैसे आल्याने त्याच्या घरचेही चक्रावले असून ते भीतीच्या सावटाखालीच वावरत होते. मात्र हे पैसे नेमके कोणी आणि कुठून पाठवले यासंदर्भातील कोणत्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही. असं असलं तरी विक्रमच्या नावे असलेल्या बँक खात्याच्या माध्यमातून मोठा घोटाळा होत असल्याची शंका पोलिसांना आहे. या प्रकरणात गुजरात पोलिसांनी संबंधित बँकेकडे तक्रार केली आहे. विक्रमचं खात यस बँकेत आहे. मात्र आपल्या नावाने हे खातं कोणी उघडलं आणि त्यामध्ये एवढी मोठा रक्कम कोणी जमा केली याबद्दलची कोणतीही कल्पना विक्रमला नाही असं त्याने पोलिसांना सांगितलं आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम असल्याने आपल्यावर पोलीस कारवाई करतील या भीतीने विक्रमने पोलिसांकडे तक्रार नोंदवली नव्हती. 


पोलीस घरी आल्यावर काय घडलं?


पोलीस घरी आल्यानंतर नेमकं काय काय घडलं हे विक्रमने सांगितलं आहे. पोलीस चौकशीसाठी घरी आले त्यांनी बँक खात्याचा क्रमांक मागितला. मात्र माझ्याकडे त्या बँकेचा क्रमांक नव्हता कारण मी खातं उघडलं नव्हते. पण त्यांनी माझ्या नावाने असलेल्या खात्याची पडताळणी केली असता या खात्यावर कोट्यवधी रुपये आढळून आले. पण या खात्याबद्दल आणि पैशांबद्दल मला कोणतीही कल्पना नाही. या संपूर्ण प्रकारामुळे माझं कुटुंब फार घाबरलं आहे. पोलिसांनी विक्रमला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असता गावकऱ्यांनी त्याला विरोध केला. विक्रम घोटाळ्यात सहभागी असल्याची पोलिसांना शंका आहे. पोलिसांकडे कोणतेही अटक वॉरंट नव्हतं त्यामुळे विक्रमला गावकऱ्यांनी अटक करु दिली नाही. 


जीवाला धोका असल्याचा दावा


हे सारं प्रकरण समोर आल्यानंतर विक्रमने एक व्हिडीओ जारी केला आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला धोका आहे. माझ्या घरी पोलीस येऊ गेले आहेत. मला अनेक ठिकाणांवरुन सतत फोन येत आहेत. माझ्या खात्यावर असलेले 200 कोटी रुपयांसाठी कोणीतरी माझ्या जीवाचं बरं वाईट करु शकतं अशी भीतीही विक्रमने व्यक्त केली आहे. मला किंवा माझ्या कुटुंबाला पैसे नकोत. या प्रकरणामध्ये पोलिसांनी लवकरात लवकर तपास करावा अशी मागणी विक्रमने केली आहे. तसेच हे पैसे सरकारने स्वत:कडे घ्यावेत असंही विक्रमचं म्हणणं आहे. आमचा जीव हा अधिक महत्त्वाचा आहे. आमचा जीव सुरक्षित राहायला हवा असं विक्रमने म्हटलं आहे.