मुंबई : नोटाबंदी झाल्यानंतर पाचशे आणि दोन हजारांच्या नव्या नोट चलनात आल्या. त्यानंतर आता केंद्र सरकारने २०० रुपयाची नोट छापण्याची तयारी सुरु केल्याचं समजतंय. 'इकॉनॉमिक टाईम्स' या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार नागरिकांचे व्यवहार सोपे व्हावेत आणि देवाणघेवाण सहजतेनं करता यावी यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्यावर्षी ८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता आणि पाचशे आणि एक हजार रुपयाची नोट चलनातून रद्द करून त्यांनी ५०० आणि २ हजाराची नवी नोट चलनात आणली आहे.  


दोन हजाराची नोट अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. तसेच सुटे पैसे देणंही अडचणीचं होत आहे. त्यामुळे २०० रुपयांच्या नोटेची मागणी सर्वच स्तरांतून केली जात होती. त्यावर विचार करून २०० रुपयांची नोट चलनात आणण्याचा निर्णय रिझर्व्ह बॅंकेने मार्च महिन्यात घेतला होता.   


या प्रक्रियेशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांनी 'इकॉनॉमिक टाइम्स'ला ही माहिती दिली. या नोटा चलनात आणण्यासाठी आणखी कालावधी लागेल. २०० रुपयाच्या नोटेमध्येही सुरक्षेवर भर देण्यात आला असून बनावट नोटा छापता येणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.