Victory Over Railways: सत्य आणि योग्य गोष्टीसाठी लढण्याची जिद्द असेल तर विजय निश्चित असतो. अशाच एका जिद्दीची घटना समोर आली आहे. अवघ्या 20 रुपयांसाठी एक व्यक्तीने भारतीय रेल्वेविरुद्ध खटला लढवला आणि त्याच्या मेहनतीचं फळही त्याला मिळालं. तब्बल 22 वर्षांनंतर रेल्वेविरुद्धचा हा खटला तो जिंकला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

22 वर्ष हा खटला नेटाने लढणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे तुंगनाथ चतुर्वेदी ( Tunganath Chaturvedi). तुंगनाथ उत्तरप्रदेशमधील (Uttar Pradesh) मथुरा (Mathura) इथे राहाणारे असून पेशाने ते वकिल आहेत. 


नेमकं काय होतं प्रकरण?
तुंगनाथ चतुर्वेदी यांच्याकडून रेल्वे बुकिंग क्लार्कने 20 रुपये जास्त घेतले होते. याविरोधात तुंगनाथ यांनी ग्राहक मंचात Consumer Forum) तक्रार दाखल केली. हे प्रकरण 1999 मधलं आहे. मथुरा इथं राहणारे तुंगनाथ 25 डिसेंबर 1999 रोजी मुरादाबादला जाण्यासाठी मथुरा कॅन्टोन्मेंट स्थानकावर (Mathura Cantonment Railway Station) गेले. मुरादाबादसाठी (Moradabad) त्यांनी दोन तिकिटं घेतली. दोन तिकिटांची किंमत होती 70 रुपये, पण बुकिंग क्लार्कने त्यांच्याकडून 20 रुपये जास्त म्हणजे 90 रुपये घेतले.


चूक लक्षात आणून दिल्यानंतरही पैसे परत दिले नाहीत
त्यावेळी एक तिकिट 35 रुपये म्हणजे दोन तिकिटांचे 70 रुपये झाले. तुंगनाथ यांनी बुकिंग क्लार्कला 20 रुपये परत करण्याची विनंती केली. पण बुकिंग क्लार्कने पैसे परत करण्यास नकार दिला. यावर त्यांच्यात भांडणही झालं. त्याच दरम्यान मुराबादची ट्रेन आल्याने तुंगनात तिथून निघून गेले. पण मुरादाबादवरुन परतताच तुंगनाथ यांनी मथुरा जिल्हा ग्राहक मंचात तक्रार दाखल केली. 


तुंगनाथ यांनी नॉर्थ ईस्ट रेल्वे गोरखपूरचे (North East Railways Gorakhpur) महाव्यवस्थापक आणि मथुरा कॅन्टोन्मेंट रेल्वे स्टेशनच्या विंडो बुकिंग क्लार्क (Station Master) विरुद्ध हा खटला दाखल केला. यात त्यांनी सरकारलाही पक्षकार बनवलं.


22 वर्ष चालला खटला
हा खटला तब्बल 22 वर्ष चालला. तुंगनाथ यांच्या मते ही लढाई 20 रुपयांसाठी नाही तर जनहितासाठी लढली होती. प्रकरणाचा निकाल उशीरा आला असला तरी ते या निर्णयाने आनंदी आहेत. इतक्या वर्षांची मेहनतीचं अखेर चीज झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे 20 रुपयांवर दरवर्षी 12 रुपयांप्रमाणे व्याज, मानसिक आणि आर्थिक मनस्ताप तसंच केससाठी झालेला खर्च असे मिळून 15 हजार रुपये रेल्वेने तुंगनाथ यांना देण्याचे आदेशही ग्राहक मंचाने दिले. हे पैसे 30 दिवसांच्या आत तुंगनाथ यांना देण्यात यावेत असंही ग्राहक मंचाने रेल्वे व्यवस्थापनला बजावलं आहे.