भारतीय सैन्याचं शौर्याचं प्रतीक कारगिल युद्धाला आज 22 वर्ष पूर्ण
राष्ट्रपती कोविंद आज द्रासमध्ये जाऊन शहिदांना श्रद्धांजली वाहणार
मुंबई : भारतीय सैन्याचं शौर्याचं प्रतीक कारगिल युद्धाला आज 22 वर्ष पूर्ण झाली आहेत. राष्ट्रपती कोविंद आज द्रासमध्ये जाऊन शहिदांना श्रद्धांजली वाहणार आहेत. कारगिल विजय दिवसाच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद द्रास इथे कारगिल युद्ध स्मारकावर श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. यावेळी, CDS बिपिन रावत देखील उपस्थित राहतील.
1999 साली कारगिल युद्धादरम्यान,भारतीय सेनेने सशस्त्र सैन्याच्या शौर्य दाखवलं होतं. तीन महिने सुरू असलेल्या या युद्धात भारतीय जवानांनी पाकिस्तानी सैन्याला आपल्या शौर्याच्या जोरावर धूळ चारली होती. तर, यात 527 जवान शहीद झाले होते.
कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपिन रावत आणि लष्कराच्या उत्तरी विभागाचे कमांडर लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी आणि लेह येथील 14 व्या कोरचे कमांडर लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन उपस्थित असतील. सकाळी आठ वाजता हा उपक्रम सुरू होईल. यानंतर 1971 च्या युद्धाची विजयी मशालही द्रास वॉर मेमोरियल येथे पोहोचेल. उपस्थित मान्यवर आणि लष्करी कमांडर यांचेकडून मशालीचे स्वागत केले जाईल.
का साजरा केला जातो कारगिल दिवस ?
1999 मध्ये कारगिलच्या उंच शिखरांवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले होते. ज्यात भारताने विजय मिळवला होता. त्या युद्धाच्या विजयाच्या स्मरणार्थ कारगिल विजय दिवस दरवर्षी कारगिलच्या द्रास येथील युद्ध स्मारकात साजरा केला जातो. 1999 मध्ये पाकिस्तानी सैन्याने भारताच्या या शिखरांवर घुसखोरी केली होती. 14 ते 18 हजार फूट उंचीवर असलेल्या या शिखरावरून भारतीय सैन्याने मोठ्या शौर्याने पाकिस्तानी घुसखोरांना पळवून लावलं होतं. या युद्धामध्ये आपले 500 सैनिक शहीद झाले होते. हे युद्ध लष्करी इतिहासामध्ये एक अतिशय कठीण आणि धोकादायक युद्ध म्हणून ओळखले जाते.