नवी दिल्ली: गेल्या काही वर्षांमध्ये देशभरात काँग्रेसला लागलेल्या उतरत्या कळेच्या पार्श्वभूमीवर पक्षातील २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात नेत्यांकडून पक्षसंघटनेत वरपासून ते खालपर्यंत मोठे बदल करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. सोनिया गांधी यांना पत्र लिहणाऱ्या या नेत्यांमध्ये पाच माजी मुख्यमंत्री, काँग्रेस कार्यकिरिणीचे अनेक सदस्य आणि काही माजी केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. त्यामुळे आगामी काही दिवसात काँग्रेसमध्ये मोठे अंतर्गत बदल घडण्याची शक्यता आहे. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पत्रात संबंधित नेत्यांनी गेल्या सहा वर्षात भाजपने चांगली कामगिरी केल्याची कबुली दिली आहे. देशातील तरुण नरेंद्र मोदी यांनाच मत देत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या पाठिंब्यात घट होत असून तरुणांचा पक्षावरील विश्वास उडत चालला आहे. ही चिंतेची बाब असल्याचे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, साधारण १५ दिवसांपूर्वी हे पत्र सोनिया गांधी यांना पाठवण्यात आले होते. यामध्ये काँग्रेसच्या सध्याच्या नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. तसेच आगामी काळात पक्षाची वाटचाल कशी असावी, यासाठी पर्यायही सुचवण्यात आले आहेत. त्यामुळे आता सोमवारी होणाऱ्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत याचे काय पडसाद उमटणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या पत्रात काँग्रेस पक्षाला प्रभावी आणि पूर्णवेळ नेतृत्त्व मिळावे, असेही सांगण्यात आले आहे. हे नेतृत्त्व लोकांच्या नजरेत राहणारे आणि प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारे असावे. भविष्यात पक्षाने एकसंधपणे वाटचाल करण्यासाठी संस्थात्मक नेतृत्त्व अत्यंत महत्त्वाचे असल्याचे या नेत्यांचे म्हणणे आहे. 

हे पत्र पाठवणाऱ्या २३ नेत्यांमध्ये राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, कपिल सिब्बल, मनिष तिवारी, शशी थरुर, खासदार विवेक तनखा, मुकूल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण, संदीप दीक्षित, भुपिंदर सिंह हुडा आदी नेत्यांचा समावेश आहे. 

गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडले होते. तेव्हापासून सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष म्हणून पक्षाचा कारभार चालवत आहेत. राहुल गांधी अजूनही पुन्हा अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्यास तयार नाहीत. त्यामुळे पक्षातील अनेक नेते नाराज आहेत.