नवी दिल्ली: कोरोना व्हायरसचा मोठ्याप्रमाणावर प्रादुर्भाव झालेल्या इराणमधून अखेर २३६ भारतीयांची सुटका झाली आहे. एअर इंडियाच्या विमानाने रविवारी सकाळी हे सर्वजण दिल्लीत दाखल झाले. यामध्ये १३१ विद्यार्थी आणि १०३ यात्रेकरूंचा समावेश असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीन आणि इटलीपाठोपाठ इराणमध्ये मोठ्याप्रमाणावर कोरोनचा प्रादुर्भाव झाला आहे. इराणमध्ये १३ हजारपेक्षा जास्त लोकांना करोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे इराणमध्ये ७०० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच इराणच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे इराणमधील भारतीयांचे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आता हे सर्व भारतीय सुखरुपपणे मायदेशी परतले आहेत. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर या सर्व प्रवाशांची तपासणी केली जात आहे. यानंतर त्यांची रवानगी जैसलमेरमधील लष्कराच्या स्वतंत्र कक्षात करण्यात येईल. 


देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १०२; भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमा बंद



तत्पूर्वी आज सकाळी रोममधून ४९ भारतीयांना दिल्लीत आणण्यात आले. त्यांची रवानगी छत्रपूर सेंटरमध्ये करण्यात आलीय. दरम्यान आज एअर इंडियाच्या विशेष विमानानं मिलानहून आणखी भारतीयांना मायदेशी आणले जाणार आहे. यापूर्वी इराणमधून मंगळवारी ५८ प्रवाशांना आणण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी ४४ प्रवाशांना आणले गेले होते.