धक्कादायक! भारतात प्रदूषणाने २५ लाख लोकांचा मृत्यू
प्रदुषणामुळे २०१५ या वर्षात भारतात सर्वाधित २५ लाख लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती लान्सेट जर्नलने प्रकाशित केलेल्या अहवालात दिलीय. हवा, पाणी आणि अन्य प्रकारच्या प्रदूषणामुळे हे मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आलीय.
नवी दिल्ली : प्रदुषणामुळे २०१५ या वर्षात भारतात सर्वाधित २५ लाख लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती लान्सेट जर्नलने प्रकाशित केलेल्या अहवालात दिलीय. हवा, पाणी आणि अन्य प्रकारच्या प्रदूषणामुळे हे मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आलीय.
यातील बहुतांश मृत्यू असंसर्गजन्य आजारातून झालेत. प्रदुषणामुळे हृदयरोग, पक्षाघात, फुफ्फुसाचा कॅन्सर, श्वसनाच्या दुर्धर आजारामुळे बहुतांश लोक मृत्यूमुखी पडले. हवेच्या प्रदूषणाचा सर्वात मोठा वाटा यात आहे. जगभरात २०१५ मध्ये ६५ लाख लोक वायू प्रदूषणाला बळी पडले. तर पाण्यातील प्रदूषणामुळे १८ लाख लोकांचा मृत्यू झालाय.
भारत, पाकिस्तान, चीन, बांगलादेश, मादागास्कर आणि केनियात उद्योग झपाट्याने वाढत असून येथे चारपैकी एक मृत्यू प्रदूषणामुळे होतो. तर कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ९२ टक्के मृत्यू हवेतील प्रदूषणामुळे झाले असल्याचं आयआयटी दिल्ली आणि अमेरिकेच्या इकान स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी नमूद केलंय.