कोलकाता : भारतात कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन दाखल झाल्यापासून महामारीचा संसर्ग वाढण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील एका शाळेत जवळपास 29 मुलांमध्ये कोविड-19 ची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर शाळेसह आजूबाजूच्या परिसरात खळबळ माजली आहे.


9 आणि 10 च्या विद्यार्थ्यांना बाधा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नादिया जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता 9वी आणि 10वीच्या 29 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. दरम्यान यासंदर्भात विद्यार्थ्यांच्या पालकांना कळवण्यात आलं आहे.


विद्यार्थ्यांना घरी क्वारंटाईन राहण्याचा सल्ला


कोविड-19 ची लागण झालेल्या सर्व 29 विद्यार्थ्यांना खोकला आणि सर्दीची सौम्य लक्षणं असल्याने त्यांना होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे. कल्याणी उपविभागीय अधिकारी हिरक मंडळ म्हणाले की, शाळेतील इतर विद्यार्थी आणि शिक्षकांची देखील कोरोना टेस्ट केली जातेय.


8 ते 12 च्या शाळा सुरु


पश्चिम बंगालमध्ये कोरोनाची प्रकरणं कमी झाल्यानंतर आठवी ते बारावीपर्यंत शाळा उघडण्यात आल्या. यावेळी कोरोनाच्या गाईडलाईन्सचं पालन करून शाळेचे वर्ग सुरू आहेत. मात्र, आता एकत्रितपणे 29 मुलं पॉझिटिव्ह आढळल्याने शिक्षकांपासून पालकांनी चिंता व्यक्त केली आहे.


भारतात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनची 213 प्रकरणं समोर आली आहेत, त्यापैकी 30 लोकं संसर्गमुक्त झाल्याची माहिती आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये ओमायक्रॉनची सर्वाधिक 57 प्रकरणं आहेत, महाराष्ट्रात 54, तेलंगणात 24, कर्नाटकात 19, राजस्थानमध्ये 18, केरळमध्ये 15 आणि गुजरातमध्ये 14 आहेत.