जम्मू: गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये बंद करण्यात आलेल्या मोबाईल आणि इंटरनेट सेवेवरील निर्बंध अंशत: उठवण्यात आले आहेत. त्यानुसार शनिवारपासून जम्मू, रेसाई, संबा, कथुआ आणि उधमपूर पाच जिल्ह्यांमध्ये टुजी मोबाईल इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली. 
 
सरकारने अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी ५ ऑगस्टपासून या भागातील मोबाईल आणि इंटरनेटसेवा खंडित करण्यात आली होती. मात्र, आता इंटरनेट सेवेवरील निर्बंध उठवण्यात आले आहेत. मात्र, येथील मोबाईलसेवा अजूनही बंद आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर जम्मू-काश्मीरच्या २२ पैकी १२ जिल्ह्यातील परिस्थिती आता पूर्वपदावर आली आहे. पुंछ आणि राजौरी सेक्टरमध्ये टेलिफोन सेवाही सुरु करण्यात आली आहे. तसेच याठिकाणी ब्रॉडबँड सेवेवरील निर्बंधही हटवण्यात आल्याचे समजते. 


उर्वरित १० जिल्ह्यांमधील परिस्थिती सामान्य झाल्यानंतर तेथील निर्बंधही उठवले जातील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. पाकिस्तानकडून इंटरनेटचा वापर करून अफवा पसरवल्या जाण्याची शक्यता आहे. तसेच दहशतवाद्यांकडूनही घातपात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी बाळगली जात आहे. 



याशिवाय, काश्मीरमधील सरकारी कार्यालयांमध्येही आजपासून कामकाजाला सुरुवात होईल. याशिवाय, अनेक भागांमधील शाळाही सुरु झाल्या आहेत. काश्मीर खोऱ्यातील शाळाही पुढील आठवड्यापासून सुरु होतील.