नवी दिल्ली : निकाल लागल्यावर काँग्रेसनं नैतिक विजयाचा दावा केलाय. निकालानंतर काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ही प्रतिक्रिया दिलीय. त्याचप्रमाणे आज राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावर काँग्रेसच्या खासदारांनी सरकारवर टीका करत गोंधळ घातला. यानंतर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं. 


 सर्व निर्दोष मुक्त


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीच्या पटियाळा हाऊस कोर्टातल्या विशेष सीबीआय कोर्टानं आज टूजी घोटाळ्यातल्या सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केलंय. याप्रकरणी सीबीआय ठोस पुरावे देण्यात सपशेल अपयशी ठरल्याचं कोर्टानं निकालात म्हटलंय. 


 द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष


आज सकाळी साडे दहा वाजता याप्रकरणी निर्णय देण्यात आला. यावेळी मुख्य आरोपी तत्कालीन दूरसंचार मंत्री ए राजा,द्रमुक खासदार कनिमोळी, द्रमुक प्रमुख करुणानिधींच्या पत्नी दयाळू अम्मल यांच्यासह सर्व आरोपी कोर्टात हजर होते. कोर्टच्या निर्णयानंतर परिसरातच उपस्थित असलेल्या द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. 


नैतिक विजय दाव्यात तथ्य नाही - भाजप


दरम्यान, टू जी प्रकरणी योग्य तपास झालेला नाही, त्यामुळे सरकारनं पुरावे असतील, तर वरच्या कोर्टात दाद मागावी, अशी प्रतिक्रिया दिलीय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी. तर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी काँग्रेसच्या नैतिक विजयाच्या दाव्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं म्हटलंय.