Google Map Accident News: एखाद्या नवीन ठिकाणी जात असताना आपण आजकाल सर्रास गुगल मॅपची मदत घेतो. आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी गुगल मॅपची सेवा खूपच फायदेशीर आहे. पण या गुगल मॅपमुळं अनेकदा रस्ता चुकायला देखील होतं. त्यामुळं अनेकदा चालक आणि प्रवासी अडचणीत येतात. उत्तर प्रदेशातील बरेली येथेही अशीच एक घटना घडली आहे. तीन प्रवासी चुकीच्या रस्त्याने गेले आणि जीवाला मुकले आहेत. या घटनेने एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसंच, प्रशासनाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मैनपुरी येथील रहिवाशी कौशलकुमार, फर्रुखाबादचे विवेक कुमार आणि अमित कुमार हे एका विवाह सोहळ्यातून घरी परतत होते. त्यांच्यासोबत त्यांचा एक मित्र देखील होता. विवाह सोहळ्यातून घरी परतण्यासाठी त्यांनी रस्ता कळावा यासाठी जीपीएस नेव्हिगेशन सुरू केले. गुगल मॅपच्या मदतीने ते प्रवास करत होते. मात्र, गुगल मॅपने त्यांना चुकीचा रस्ता दाखवला. मॅपवरील एका रस्त्यावर पुलाचे बांधकाम अर्धवट होते. मात्र गुगल मॅपवर याची माहितीच नव्हती. 


तिघेही त्याच रस्त्याने गेले मात्र चालकाचा हे लक्षात येईपर्यंत उशीर झाला होता. चालकाला जेव्हा कळलं की पुढे पुलच नाहीये तोपर्यंत उशीर झाला होता. त्याला कारवर नियंत्रण मिळवणे अवघड गेले व कार थांबवता न आल्यामुळं ते रामगंगा नदीत गाडीसह 25 फूट उंचीवरुन खाली कोसळले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, रात्रीची वेळ असल्याने याअपघाताबाबत कोणालाच कळले नाही. त्यामुळं बचावकार्य सुरू करण्यास खूप वेळा गेला. तोपर्यंत तिघांचाही मृत्यू झाला होता. सकाळी स्थानिकांच्या हा प्रकार लक्षात आला तेव्हा याबाबत प्रशासनाला माहिती देण्यात आली. 


2022 मध्ये पुलाचा एक भाग कोसळला होता. त्यानंतर या पुलाचे बांधकाम सुरु होते. पुलाचे बांधकाम अर्धवटच होते. मात्र, प्रशासनाने पुलावर कोणत्याही प्रकारचा फलक लावला नव्हता. ज्यामुळं या पुलाचे बांधकाम अर्धवट आहे, हे लक्षात येईल. यामुळं प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या अपघातात प्राण गमावलेल्या विवेक आणि कौशल कुमार हे दोघं भाऊ होते तर चालक त्यांचा मित्र होता. त्यांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. अपघातात कारचा चक्काचूर झाला असून तिघांचे मृतदेह जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. मात्र या एका घटनेने तंत्रज्ञानावर किती विसंबून राहावे, याचा शोध घेणेही गरजेचे आहे.