राजस्थानमध्ये हवाई दलाचं MIG-21 विमान थेट घरावर कोसळलं, 4 जण जागीच ठार
MiG 21 Crashed on Home: राजस्थानमधील (Rajasthan) सुरतगढ (Suratgarh) येथून हवाई दलाच्या लढाऊ विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने टेक ऑफ केल्यानंतर काही वेळातच कोसळलं. या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला आहे.
MiG 21 Crashed on Home: भारतीय हवाई दलाचं MIG-21 लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे. तांत्रिक बिघाड झाल्याने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमान खाली कोसळलं. हे विमान एका घऱावर कोसळलं असून यामध्ये चौघे ठार झाले आहेत. सूरतगढ हवाई तळावरुन या विमानाने उड्डाण केलं होतं. दैनंदिन सरावाचा भाग म्हणून विमानाने उड्डाण केलं असता काही क्षणात ते खाली कोसळलं.
विमान दुर्घटनाग्रस्त होत असल्याचं लक्षात येताच वैमानिकाने पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारली अशी माहिती दिली आहे. वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती हवाई दलाने दिली आहे. हवाई दलाने सांगितलं आहे की, वैमानिकाला किरकोळ दुखापत झाली आहे. दरम्यान याप्रकरणी हवाई दलाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
"भारतीय हवाई दलाचं MiG-21 विमान आज सकाळी ट्रेनिंग सुरु असताना सूरतगढ येथे कोसळलं आहे. वैमानिक सुरक्षित असून, किरकोळ जखमी झाला आहे. या दुर्घटनेच्या कारणांची माहिती घेण्यासाठी चौकशी सुरु करण्यात आली आहे," असं ट्वीट हवाई दलाने केलं आहे.
दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान कोसळल्यानंतर घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. "जीवितहानी होऊ नये यासाठी वैमानिकाने पूर्ण प्रयत्न केले. त्याने गावाच्या बाहेर विमान नेण्याचा प्रयत्न केला," अशी माहिती बिकानेरचे पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांनी दिली आहे.
MIG-21 चा मोठा इतिहास
1971 च्या लढाईत MIG-21 विमानाने पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं होतं. तब्बल 6 दशकांपासून MIG-21 भारतीय वायुसेनेचा कणा असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्याच्या सुरक्षेसंबधी प्रश्न उपस्थित केले जात आहे. याचं कारण MIG-21 च्या दुर्घटनेत वाढ झाली आहेत. गेल्या 60 वर्षात 400 वेळा हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे. यामध्ये 200 जवान शहीद झाले असून, 60 नागरिकांनी आपला जीव गमावला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून MIG-21 ला लढाऊ विमान म्हणून ओळखलं जात आहे. 1963 मध्ये सर्वात प्रथम रशियाने भारताला एक इंजिनचं MIG-21 विमान दिलं होतं. यानंतर भारतीय हवाई दलाने आपल्या ताफ्यात 847 विमानं सहभागी करुन घेतली होती.