श्रमिक रेल्वेत ३७ बालकांचा जन्म, कोणाचं नाव `करुणा` तर कोणाचं `लॉकडाऊन` यादव
लॉकडाऊन दरम्यान रेल्वेत अनेक बाळांचा जन्म
मुंबई : कोरोना विषाणूमुळे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आलं. त्यानंतर इतर राज्यांमध्ये कामासाठी गेलेले अनेक मजूरवर्ग आर्थिक अडचणीत सापडला. त्यामुळे अशा वर्गासाठी भारतीय रेल्वेने स्पेशल रेल्वे सुरु केल्या. ज्यामध्ये प्रवास करताना ३६ बालकांचा जन्म झाल्याची माहिती पुढे आली आहे. या दरम्यान जन्मलेल्या मुलांची नावे देखील खूप मनोरंजक ठेवली जात आहेत. कोणी आपल्या मुलीचे नाव करुणा ठेवले आहे तर कोणी लॉकडाऊन यादव. कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. संपूर्ण अर्थव्यवस्थेची घडी मोडली गेली आहे.
छत्तीसगडच्या धरमपुरा येथे राहणाऱ्या करुणाचे वडील राजेंद्र यादव यांनी वृत्तसंस्था पीटीआयला माहिती दिली की, त्यांनी आपल्या मुलीचे नाव करुणा ठेवले आहे. करुणा म्हणजे दया. ते म्हणाले की, 'अनेकांनी मला कोरोना हे नावं सूचवले. पण ज्या व्हायरसमुळे लोकांचा जीव जात आहे ते नाव मी कसे देऊ?'. करुणाचा जन्म देश जेव्हा कोरोनाशी लढत आहे. त्या दरम्यान झाला.
श्रमिक स्पेशल ट्रेनने मुंबईहून उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या रिना यांनी देखील आपल्या मुलाचे नाव लॉकडाउन यादव ठेवले आहे. जेणेकरून ज्या वेळी त्याने जन्म घेतला त्या कठीण काळाची आठवण कायम राहील. ते म्हणाले की, 'त्याचा जन्म एका अत्यंत कठीण परिस्थितीत झाला. म्हणून आम्हाला त्याचे नाव लॉकडाऊन यादव ठेवायचे होते.
ममता यादव ही आणखी एक महिला आहे जी आठ मे रोजी जामनगर-मुजफ्फरपूर श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये चढली. बिहारच्या छपरा जिल्ह्यात जेव्हा तिने मुलाला जन्म दिला तेव्हा तिची आई तिच्याबरोबर असावी अशी तिची इच्छा होती. पण डेस्टिनेशन स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी तिने आपल्या मुलाला हातात घेतलं. ममताच्या डिलिव्हरी वेळी इतर प्रवासी डब्यातून बाहेर निघून गेले आणि डब्याचं रुपांतर एका डिलिव्हरी रूममध्ये झालं.
डॉक्टर आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी अशा अनेक मातांना मदत केली. या विशेष गाड्यांमध्ये बऱ्याच गर्भवती महिलांनी प्रवासादरम्यान इतर प्रवाशांच्या मदतीने बाळांना जन्म दिला.