मुंबई : देशभरातील सर्वाधिक उत्पन्न असणाऱ्या आमदारांची यादी जाहीर झाली आहे. एकूण ३१४५ आमदारांमध्ये सर्वात जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या पहिल्या २० आमदारांमध्ये महाराष्ट्रातील 4 आमदारांनी स्थान मिळवले आहे. उद्योगपती आणि भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांचं वार्षिक उत्पन्न ३४.६६ कोटी असून त्यांनी व्यवसाय म्हणून नोकरी दाखवली आहे. ते या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं वार्षिक उत्पन्न ४.५६ कोटी असून त्यांचा व्यवसाय शेती आहे. ते या यादीत शेवटच्या म्हणजे विसाव्या क्रमांकावर आहेत. सोलापूर जिल्ह्यातील दिलीप सोपल हे या यादीत सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांचं वार्षिक उत्पन्न ९.८५ कोटी आहे. पनवेलचे प्रशांत ठाकूर यांचं वार्षिक उत्पन्न- ५.६१ कोटी आहे, ते या यादीत १७ व्या स्थानी आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमदार एन. नागराजू (वार्षिक उत्पन्न १५७.०४ कोटी) हे पहिल्या क्रमांकावर आहेत. सर्वात कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या टॉप २० आमदारांच्या यादीत महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे वार्षिक उत्पन्न ९.०९ लाखांसह २० व्या स्थानावर आहेत.


२०१३ ते २०१७ दरम्यान निवडणुकांमध्ये देशातील ४०८६ आमदारांपैकी ३१४५ आमदारांनी वार्षिक उत्पन्न निवडणूक आयोगाकडे सादर केले आहे. ९४१ आमदारांनी अजूनही त्यांची संपत्ती घोषित केलेली नाही. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) हा अहवाल तयार केला आहे.


पाचवी ते १२ वीपर्यंत शिकलेल्या १०५२ आमदारांचे वार्षिक उत्पन्न ३१.०३ लाख रुपये आहे. तर पदवीधर आणि त्या पुढील शिक्षण असलेल्या १९९७ आमदारांचे सरासरी वार्षिक उत्पन्न २०.८७ लाख रुपये आहे. आठवी पास १३९ आमदारांचे वार्षिक उत्पन्न ८९.८८ लाख आहे. अशिक्षित आमदारांचं सरासरी वार्षिक उत्पन्न ९.३१ लाख रुपये आहे.


कर्नाटकमधील एकूण २०३ आमदारांचे वार्षिक उत्पन्न १११.४ लाख रुपये आहे तर महाराष्ट्राच्या एकूण 256 आमदारांचं वार्षिक उत्पन्न ४३.४ लाख रुपये आहे. कर्नाटक पहिल्या तर महाराष्ट्र या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.