दिल्लीत 4 दहशतवादी घुसले, 15 ऑगस्टला हल्ल्याची शक्यता
दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ल्याचं सावट
नवी दिल्ली : देशभरात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. पण दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. यातच सुरक्षा विभागाची चिंता वाढली आहे. जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे.
4 दहशतवादी दिल्लीत घुसले
सूत्रांच्या माहितीनुसार दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने जम्मू काश्मीरच्या मार्गे दिल्लीमध्ये 4 दहशतवाद्यांना पाठवलं आहे. हे जुलैपासून दिल्लीमध्ये आहेत. यामधला एक दहशतवादी पेशावरचा राहणारा आहे. वेगवेगळ्या ठिकाणी हल्ल्य़ाची यांची योजना असल्याची माहिती आहे. जैशचा कमांडर इब्राहिम पंजाबीने या सर्व हल्ल्याची योजना आखल्याचं देखील समोर आलं आहे.
सुरक्षा वाढवली
गुप्तचर यंत्रणांनी दिल्ली पोलीस आणि स्पेशल सेलला अलर्ट केलं आहे. दिल्लीतील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. प्रत्येकावर लक्ष ठेवलं जात आहे. लाल किल्ला, संसद भवन, राष्ट्रपती भवन, नॉर्थ ब्लॉक, साऊथ ब्लॉकसह गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.