नवी दिल्ली: पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या ४० जवानांना सरकारकडून अजून शहिदाचा दर्जा देण्यात आलेला नाही. मात्र, तेच सरकार उद्योगपती अनिल अंबानी यांच्याबाबत कमालीची तत्परता दाखवते, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पंतप्रधान मोदींना पुन्हा एकदा लक्ष्य केले. राहुल यांनी म्हटले आहे की, शूर जवान शहीद झाले. त्यांचे कुटुंबीय सध्या झगडत आहेत. या जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली तरी त्यांना शहिदाचा दर्जा नाकारण्यात येत आहे. तर दुसरीकडे अनिल अंबानी यांनी देशाला कधीच काही दिले नाही फक्त घेतले. परंतु, त्यांना ३० हजार कोटींचे बक्षीस देण्यात आले. जेणेकरून ते आता आनंदात राहतील. मोदींच्या 'न्यू इंडिया'मध्ये स्वागत आहे, अशी खोचक टिप्पणी राहुल गांधी यांनी केली आहे. 



एरिक्सन कंपनीने अनिल अंबानी यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात गुरुवारी न्यायालयाने अंबानी यांना मोठा दणका दिला होता. न्यायालयाने याचिकेवर सुनावणी करत एरिक्सन इंडियाच्या बाजूने निर्णय दिला. अनिल अंबानी यांनी चार आठवड्यात थकवलेले ४५३ कोटी रुपये भरावे अन्यथा तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगण्यास तयार रहावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.