उत्तरखंड बचावकार्याला यश! 17 दिवसांनंतर बोगद्यातून कामगारांची सुटका
उत्तराखंडच्या सिलक्यारा बोगद्यात (Silkyara Tunnel) अडकलेल्या 41 कामगारांना बाहेर काढण्यासाठी गेले 17 दिवस सुरु असलेल्या प्रयत्नांना अखेर यश आलं आहे. एनडीआरएफच्या जवानांनी आतापर्यंत पाच मजूरांना सुखरुप बोगद्याच्या बाहेर काढलं आहे.
Uttarakhand Tunnel Rescue: उत्तराखंडच्या उत्तरकाशी इथल्या बोगद्यात अडकलेल्या सर्व कामगारांना (Workers Resque) अखेर सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. संध्याकाळी सात वाजून पाच मिनिटांनी पहिल्या कामगारा बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर थोड्याचवेळात आणखी चार कामगारांनाही बाहेल काढलं. या पाच कामगारांना तात्काळ अॅम्ब्युलन्सने रुग्णालयात दाखल करण्यता आलं आहे. बचाव पथकाने कामगारांच्या कुटुंबीयांना त्यांचे कपडे आणि बॅग तयार ठेवण्यास सांगितलं होतं. बाहेर काढताच मजुरांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आलं.
त्यानंतर दोन तासांच्या अंतरात सर्व 41 कामगारांना बाहेर काढलं. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि केंद्रीय मंत्री जनरल वीक सिंह यांनी या सर्व कामगारांचं स्वागत केलं आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यानंतर सर्व कामगारांना अॅम्ब्युलन्समध्ये बसवून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. चिन्यालीसौड इथल्या आरोग्य केंद्रात या सर्व कामगारांवर उपचार सुरु असून त्यांच्या साठी 41 बेडचा वेगळा वॉर्ड बनवण्यात आला आहे. रुग्णालयात त्यांचा बीपी, हार्टबीट, शुगर सर्व तपासण्या केल्या जातील. सलग सतरा दिवस अंधाऱ्या बोगद्यात अडकून पडल्याने कामगारांना हायपर टेन्शनचा त्रास होऊ शकतो. तसंच एंजायटीही वाढू शकते. हे सर्व लक्षात घेऊन त्यादृष्टीने सर्व वैद्यकीय सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
लोकांकडून स्वागत
सर्व 41 कामगार बोगद्यातन बाहेर येताच बोगद्याच्या बाहेर जमलेल्या त्यांच्या कुटुंबियांनी आणि हजारो लोकांनी त्यांचं हार घालून स्वागत केलं. कामगारांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर आपला माणूस परल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. लोकांनी फटाके फोडत जल्लोष केला. स्थानिक लोकांनी लाडूही वाटले.
काय होती नेमकी घटना
उत्तरकाशी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर स्थित, सिल्क्यरा बोगदा हा केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी चारधाम 'ऑल वेदर रोड' प्रकल्पाचा एक भाग आहे. ब्रह्मखल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर बांधण्यात येत असलेला हा बोगदा 4.5 किलोमीटर लांब आहे. 12 नोव्हेंबर रोजी बोगद्याचा काही भाग कोसळला होता. त्यामुळे कामगार बोगद्यात अडकले. त्यांची सुटका करण्यासाठी 16 दिवसांपासून बचावकार्य सुरू होतं.