Uttarakhand News : उत्तराखंडच्या हल्दवानी तुरुगांतून (Haldwani Jail) एक खळबळजनक वृत्त समोर आले आहे. उत्तराखंडच्या हल्दवानी तुरुंगात 44 कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह (Prisoners Tested HIV Positive) आढळले आहेत. कारागृहातील 44 कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळल्याने कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे. ही माहिती समोर आल्यानंतर सर्व रुग्णांवर हल्दवानी येथील सुशीला तिवारी सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाधित कैद्यांमध्ये एका महिलेचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे याआधीही अशा प्रकारे रुग्ण आढळून आले होते. मात्र पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे हल्दवाणी कारागृहात एचआयव्ही बाधित कैद्यांची संख्या वर्षानुवर्षे वाढत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हल्दवाणी कारागृहात सध्या 1629 पुरूष कैदी आहेत, तर महिला कैद्यांची संख्या 70 आहे. अशातच एका महिलेसह 44 कैद्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्याने कारागृह प्रशासन हतबल झाले आहे. त्याचवेळी 44 कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आता कारागृह प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे कारागृह प्रशासनाकडून इतर कैद्यांचीही नियमित तपासणी करण्यात येत आहे. जेणेकरून इतर कैद्यांवरही वेळीच उपचार देता येऊ शकतील.


यासर्व प्रकाराबाबत रुग्णालयाच्या एआरटी सेंटरचे प्रभारी डॉ. परमजीत सिंग म्हणाले की, "महिन्यातून दोनदा रुग्णालयाची टीम नियमित तपासणीसाठी कारागृहात येते. सर्व कैद्यांची तपासणी केली जाते, ज्यांना सौम्य लक्षणे आहेत त्यांना औषध देऊन बरे केले जाते. अधिक समस्या असलेल्या रुग्णांना रुग्णालयात उपचार दिले जातात."


हा सर्व प्रकारानंतर कारागृह प्रशासनाकडून कैद्यांची नियमित तपासणीही केली जात आहे. जेणेकरून योग्य वेळी एचआयव्हीची लागण झाल्याचे कळून येईल आणि त्यांच्यावर उपचार करता येतील. एचआयव्ही रुग्णांसाठी एआरटी सेंटर सुरू करण्यात आल्याचेही डॉ. परमजित सिंग यांनी सांगितले. बाधित रुग्णांवर येथे उपचार करण्यात येत जातात. कारागृहातील कैद्यांची डॉक्टरांची टीम सातत्याने तपासणी करत आहे. एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळलेल्या कोणत्याही कैद्याला मोफत उपचार आणि औषधे दिली जातात, असेही डॉक्टरांनी सांगितले.


दरम्यान, या कारागृहातून एचआयव्हीचे इतके रुग्ण का सापडत आहेत, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.दुसरीकडे एचआयव्ही किंवा एड्सची अनेक कारणे असू शकतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दुसरीकडे या कारागृहात 50 हून अधिक कैद्यांना एचआयव्हीची लागण झाल्याचा दावाही प्रसारमाध्यमांमध्ये केला जात आहे. मात्र, कारागृह प्रशासनाकडून याबाबत कोणतेही निवेदन आलेले नाही. त्यामुळे आता कारागृह प्रशासनावर बोट उचलले जात आहे. मात्र, कारागृह प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून इतर कैद्यांची चौकशी सुरू केली आहे.