एकदोन नव्हे, येत्या काळात तब्बल 47 टक्के महिला नोकरी सोडण्याच्या तयारीत; कारणं वाचून धक्का बसेल
Job News : तुम्हीही यापैकीच एखाद्या कारणामुळं नोकरी सोडताय? जाणून घ्या इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांना का सोडायचीये नोकरी
Job News : नोकरी... अनेकांसाठी आर्थिक स्थैर्य देणारा एक स्त्रोत. काहींना स्वातंत्र्याची जाणीव करून देणारं तर काहींसाठी या नोकरीची परिभाषा इतकी वेगळी असते की, ती अनेकांच्या लक्षातही येणार नाही. स्वप्न पाहण्याचं स्वातंत्र्य देणारी, आर्थिक सुबत्ता देणारी अशी ही नोकरी कितीही महत्त्वाची असली तरीही येत्या काळात, साधारण आगामी दोन वर्षांच्या कालावधीमध्ये मोठ्या संख्येनं महिलावर्ग त्यांच्या सध्याच्या नोकरीला राजीनामा देऊ शकतो असं म्हटलं जात आहे.
एऑनने नुकत्याच केलेल्या सर्व्हेक्षणातून यासंदर्भातील माहिती समोर आली. जिथं, भारतातील विविध कंपन्यांमधील जवळपास 47 टक्के महिला येत्या काळात नोकरी सोडण्याच्या विचारात असून, त्याबाबतचा अंतिम निर्णय घेतील असा खुलासा या अहवालातून झाला आहे.
2024 व्हॉईस ऑफ विमेन स्टडी इंडिया या अहवालात सदर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. सध्या नोकरी करत असणाऱ्या कंपनीमध्ये आपण येत्या काळात नेमका आणखी किती काळ काम करू शकू यासंदर्भात महिला साशंक असल्याची बाब या अहवालातून उघड झाली. 560 कंपन्यांमधील 24 हजार महिला कर्मचाऱ्यांनी या सर्व्हेक्षणामध्ये सहभागी होत त्यांची मतं नोंदलवली होती.
काय आहेत नोकरीविषयी साशंकता निर्माण करणारी कारणं?
महिलांच्या मनात नोकरीविषयी नेमकी साशंकता का आहे, यासंदर्भातली काही कारणं या सर्व्हेक्षणातून समोर आली असून, नोकरीच्या ठिकाणी होणारा भेदभाव, पगार आणि पद वाढीची किमान शक्यता, वेतनश्रेणीमध्ये (salary) दिसणारी असमानता या आणि अशा कारणांमुळे मोठ्या संख्येनं महिला सध्या नोकरी करत असणाऱ्या संस्थेला रामराम करण्याच्या विचारात दिसत असून येत्या काळात त्या नव्या प्रगतीच्या वाटेवर नेणाऱ्या संधी शोधण्याच्या विचारात असल्याचं पाहायला मिळत आहे.
हेसुद्धा वाचा : 1,78,62,62,73,00,00 रुपयांच्या संपत्तीचा वारसदार कोण? गौतम अदानींनी घेतली चार नावं
अहवालातील आकडेवारीनुसार जवळपास 90 टक्के महिला त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी आवश्यत ते प्रयत्न आणि मेहनत करण्यास तयार असून, 42 टक्के महिलांना नोकरीच्या ठिकाणी भेदभावाचा सामना करावा लागत आहे.