जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीरमध्ये कामासाठी गेलेल्या ५ बिगर काश्मिरी मजुरांची दहशतवाद्यांनी हत्या केलीय. कुलगाव इथे हे हत्याकांड घडलंय. काम करत असलेल्या मजुरांवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात हे मजूर ठार झाले. एक मजूर जखमी झालाय. 


काश्मीर खोऱ्यातली वीज गायब करण्याचा प्रयत्न


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काश्मीर खोऱ्यात अशांतता माजवण्यासाठी दहशतवादी विविध प्रयोग करतायत. त्यात आता खोऱ्यातली वीज गायब करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दक्षिण कश्मीरच्या शोपियांमध्ये दहशतवाद्यांनी दोन टॉवर उद्ध्वस्त करण्याचा असफल प्रयत्न केला. चितरगाममध्ये त्यांनी हा प्रयत्न केला. 


तपासादरम्यान शोपियांमध्ये टॉवरचा खालचा भाग कापलेला दिसला. टॉवर नष्ट करण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१५मध्येही असाच प्रयत्न झाला होता. मात्र त्यावेळी दहशतवाद्यांनी मोबाईल टॉवर तोडण्याचा प्रयत्न केला होता. पण जवानांनी त्या दहशवाद्यांना ठार केलं होतं.  


युरोपीय महासंघाचं शिष्टमंडळ दौऱ्यावर


तर आजपासून, युरोपीय महासंघाच्या २८ जणांच्या शिष्टमंडळ आज जम्मू-काश्मीरला दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी काश्मीरच्या दाल लेकला भेट दिली. तसंच काश्मीरमधल्या स्थानिकांशी, सरपंचांशी संवाद साधला. त्याआधी लष्कराच्या उत्तर विभागाचे प्रमुख धिल्लोन यांचीही त्यांनी भेट घेतली आणि काश्मीरमधील परिस्थिती जाणून घेतली. 


दरम्यान, शिष्टमंडळाच्या या दौऱ्यावर विरोधकांनी मात्र आक्षेप घेतलाय. देशातील खासदारांना काश्मीर दौऱ्यावर जाण्यास मनाई आहे, मात्र, युरोपीय महासंघाच्या शिष्टमंडळासाठी पायघड्या घातल्या जात असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.